दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । सातारा । केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमानुसार एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तु वापरण्यास प्रतिबंधित केले आहे. याची जिल्ह्यात 1 जुलै पासून कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
एकल वापर प्लास्टिक (एसयूपी) बंदी/अंमलबजावणीसाठीची जिल्हास्तरीय कृति दलाची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एल.एस. भड यांच्यासह नगर परिषदांचे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
प्लास्टिक कचऱ्याचे विलगीकरण, संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट यासाठी असणारी यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, सविस्तर कृती आराखड्यासह शैक्षणिक संस्था (शाळा, महाविद्यालये), एनसीसी, एनएसएस, स्काऊट्स, युवा क्लब, इको क्लब आणि स्वयंसेवी संस्थांचा समावेश करुन प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी एक मजबूत सार्वजनिक चळवळ उभी करावी. बंदी घातलेल्या एकल वापर प्लास्टिक वस्तुंचा वापर करण्यास परावृत्त करावे. तसेच पर्यायांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी दुकानदार आणि बाजार संघटनांसोबत बैठक घ्यावी.
ग्रामीण भागातील आठवडी बाजारांमध्ये प्लास्टिक वापराबाबत बंदी घालण्यात यावी. ग्रामपंचायती सुक्या व ओल्या कचऱ्यांवर प्रक्रिया करत नाही कचरा हा सार्वजनिक ठिकाणी टाकला जातो. कचऱ्याच्या व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल यासाठी लवकरच ग्रामपंचायतींची कार्यशाळा घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.