बैलगाडी शर्यतीच्या परवानगीसाठी रूपये पन्नास हजार इतक्या प्रतिभूती ठेवीसह अर्ज शर्यतीच्या १५ दिवस आधी करावा – उपविभागीय अधिकारी रिचर्ड यानथन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । सातारा ।  कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय यांच्याकडील अधिसूचनेनुसार बैलगाडी शर्यतीचे आयोजन करू इच्छिणाऱ्या  आयोजकांनी  बैलगाडी शर्यत आयोजित करण्याच्या किमान 15 दिवस आधी अनुसूची अ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नमुन्यामध्ये  तसेच प्रत्येक बैलगाडी शर्यतीकरीता बॅक हमीच्या स्वरूपात किंवा मुदत ठेव पावतीच्या स्वरूपात रूपये पन्नास हजार इतक्या प्रतिभूती ठेवीसह अर्ज सादर करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.

गाडीवान म्हणून बैलगाडी शर्यतीत सहभाग घेऊ इच्छिणारा कोणताही गाडीवान किंवा सहभागी त्यांच्या ओळखीबाबतचा पुरावा आणि बैल व वळू यांचे छायाचित्रांसह  शर्यतीचे 48 तास आधी आयोजकांकडे अनूसूची सी मध्ये अर्ज करावे.

शर्यतीत सहभाग घेणाऱ्या सर्व व्यक्तींनी, नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यवसायिकाकडून बैलाची / वळूची तपासणी करुन आणि ते निरोगी असल्याचे प्रमाणित करुन घ्यावे व शर्यतीच्या अगोदर अनुसूची ब मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नमुन्यामध्ये नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यावसायिकाचे प्रमाणपत्र प्राधिकृत अधिकारी यांचेकडे सादर करावे. स्वास्थ्य (फीटनेस) प्रमाणपत्राची वैधता, शर्यतीचे दिवस धरुन 48 तास इतकी असेल.

शर्यतीस प्रारंभ होण्यापूर्वी शर्यतीत उपस्थित राहणाऱ्या तीन अधिकाऱ्यांनी  आयोजकाकडून अर्जाचे नमुने आणि नोंदणीकृत पशुवैदयकीय व्यवसायिकाने दिलेले स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर करावे लागेल. ज्या गाडीवाल्याकरीता व बैलाकरिता अर्जाचे नमुने आणि पशुवैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र आयोजकांनी प्राप्त केले आहे, त्यांनी ती प्राधिकृत अधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक असून, तोच गाडीवान व बैल शर्यतीत भाग घेऊ शकेल.

आयोजक यांनी बैलगाडी शर्यतीच्या अर्जात आणि परवानगीत ठरवून दिलेल्या ठिकाणीच व दिनांकास  स्पर्धेचे आयोजन करावे.  1000 मीटर अंतरापेक्षा अधिक लांबीचे अंतर नसेल अशा योग्य धावपट्टीवर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात यावे. ही धावपट्टी अतिशय उतार असलेली नसावी तसेच दगड,खडक, चिखल, दलदल, पाणथळ असलेल्या ठिकाणी धावपट्टी नसावी. बैलगाडा शर्यत रस्त्यावर किंवा महामार्गावर आयोजित करु नये.

बैलांना किंवा वळूंना एखादया विशिष्ट शर्यतीसाठी किमान 30 मिनिटे आराम दयावा. एखादया वळूचा किंवा बैलाचा वापर एका दिवसामध्ये तीन पेक्षा अधिक शर्यतीत करण्यात येऊ नये. धावपट्टीवर आणण्यापूर्वी किमान 20 मिनिटे त्यांना आराम दयावा.

केवळ फक्त एकाच गाडीवानास बैलगाडी चालवण्यास परवानगी असेल आणि अन्य कोणतेही वाहन धावपट्टीवर किंवा धावपट्टी बाहेर बैलगाडीसोबत चालवता येणार नाही. कोणताही गाडीवान, मालक, आयोजक, प्रस्ताव देणारी व्यक्ती, तिच्याकडे किंवा गाडीवर कोणत्याही प्रकारची काठी, चाबूक, पिंजरी किंवा बैलास दु:खापत करु शकेल किंवा बैलास विजेचा धक्का देऊ शकेल असे कोणत्याही साधन अथवा उपकरण बाळगणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी.

पायबांधणे, किंवा बैलास काटयाने मारणे अथवा पायाने मारणे अथवा चाबूक, पिंजरी यासारखी साधने अथवा विदयुत धक्का किंवा अन्य साधनांचा वापर करणे, जननअंग पिळणे अथवा जननअंगावर लाथ मारणे किंवा आरुने जननअंगास इजा पोहचवणे अथवा शेपूट पिरगळणे, शेपटीस चावा घेणे यास गाडीवान यांना कडक प्रतिबंध असेल. शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलांच्या अथवा वळूंच्या जोडया या एकमेकाशी योग्यरित्या सुसंगत असाव्यात.

शर्यतीमध्ये धावणा-या वळू अथवा बैलांना इतर कोणत्याही प्रकारच्या प्राण्यासोबत जुंपण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी.वळू अथवा बैलांसाठी असलेल्या आरामाच्या जागी पुरेशी सावली, निवारा, पुरेसे खाद्य, चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध असावे. आरामाची जागा नीटनीटकी स्वच्छ व आरोग्यदायी असावी. आयोजकांनी उत्सवामध्ये नोंदणीकृत पशुवैदयकीय व्यवसायाची सेवा किंवा पशु रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध असलेची खात्री करावी. आयोजकांनी बैलगाडी शर्यत आयोजीत करण्याकरिता वापरण्यात येणा-या प्राण्यांना कोणत्याही व्यक्तीकडून किंवा त्याचा प्रभार असणा-या व्यक्तीकडून बैलगाडी शर्यतीपूर्वी किंवा दरम्यान कोणत्याही साधनाद्धारे कोणतीही वेदना किंवा यातना दिली जाणार नाही याची खात्री करावी.

आयोजकांनी बैलगाडी शर्यत आयोजीत करण्याकरिता बैलांना / वळूंना कोणतेही उत्तेजक औषधी द्रव्य, क्षोभक प्रदार्थ, अल्कोहोल किंवा मादक द्रव्य इत्यादी अगोदर देण्यास मनाई असेल व दिली नसल्याची खात्री करावी. शर्यती दरम्यान उपस्थित अणाऱ्या कोणत्याही गाडीवानास कोणतेही उत्तेजक औषधी द्रव्य, क्षोभक प्रदार्थ, अल्कोहोल किंवा मादक द्रव्य इत्यादी बाळगण्यास मनाई असेल. शर्यंतीच्यावेळी कधीही ज्या वळू व अथवा बैलामध्ये थकवा, निर्जलीकरण अस्वस्थतता, घोळणा फुटणे, दुखापत इत्यादी लक्षणे उपस्थित अधिका-यांना स्वत:हून किंवा प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे आढळून आली तर अशा वळू अथवा बैलांना शर्यतीमध्ये भाग घेण्यास परवानगी देवू नये. आयोजकांनी बैलगाडी शर्यतीच्यावेळी वैदयकीय सेवा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे का याची सुनिश्चिती करावी.

आयोजकांनी बैलगाडी शर्यतीच्यावेळी प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व सावधगिरीच्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत का याची खात्री करावी.  धावपट्टीच्या दोन्ही बाजूस प्रतिबंधात्मक कठडे बांधणे किंवा इतर सुरक्षिततेची उपाययोजना आयोजकांनी करावी. बैलगाडया शर्यतीच्या दरम्यान गाडीवानास बैलगाडीच्या चाकास वा इतरत्र अडकून अपघात होऊ शकेल अशा स्वरुपाचे सैल अथवा तत्सम स्वरुपाचे कपडे परिधान करण्यास परवानगी देऊ नये.

स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींची माहिती, बैलगाडी शर्यतीचा अनुपालन अहवाल आणि संपूर्ण आयोजनाचे डिजीटल स्वरुपातील चित्रीकरण, बैलगाडीची शर्यत संपल्यानंतर 15 दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, सातारा उपविभाग सातारा यांचे कार्यालयाकडे आयोजकांनी सादर करावी.

जर बैलगाडा शर्यतीचे आयोजन अधिनियम आणि नियमन मधील शर्तीनुसार झाले नाही किंवा आयोजकांनी स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींची माहिती, बैलगाडा शर्यतीचा पूर्तता अहवाल आणि संपूर्ण शर्यतीचे डिजीटल स्वरुपाचे चित्रीकरण सादर करण्यास कसूर केला किंवा कोणत्याही व्यक्तीकडून स्पर्धा सुरु झाल्यापासून 48 तासांच्या आत     कोणत्याही शर्तींचा भंग झाल्या विषयी तक्रार प्राप्त झाली  आणि आयोजकांनी शर्त भंग केल्यास  जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांची खात्री पटल्यास आयोजकांची प्रतिभूती ठेव जप्त करण्यात येऊन आयोजकांना बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यास यापुढील काळात मनाई करण्यात येईल. तसेच स्पर्धेचे ठिकाणी ध्वनी प्रदूषण अधिनियम (विनियम व नियंत्रण) 2004 चे तरतुदीचे उल्लंघन होणार याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. कोविड – 19 प्रतिबंधक दोन्ही लस घेतलेल्या व्यक्तींनाच शर्यतीमध्ये प्रवेश देण्यात येईल, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी, सातारा यांनी कोव्हिड -19 अंतर्गत दिलेल्या आदेशातील नियमांचे तंतोतंत पालन करणे आयोजकांवर बंधनकारक राहिल, असेही उपविभागीय अधिकारी रिचर्ड यानथन यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!