दैनिक स्थैर्य । दि. २२ फेब्रुवारी २०२२ । सातारा । जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम 2021-2022 अंतर्गत जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामीण भागातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना जिवनावश्यक वस्तु पुरविणे या योजनेखाली पिठाची गिरीण पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सोनाली पोळ यांनी केले आहे.
योजनेच्या लाभाचे अर्ज पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. लाभार्थीचे उत्पन्न 1 लाख 20 हजारापर्यंत असावे, लाभार्थीचे वय 18 ते 60 वर्षापर्यंत असावे, जातीचा दाखला प्रांताधिकारी/ तहसीलदार यांचा असावा, लाभार्थी स्वमालकीचा घराचा 8-अ उतारा, लाईट बिलाची छायांकित प्रत, आधारकार्ड छायांकित प्रत व बँक पासबुक छायांकित प्रत अर्जा सोबत जोडावी.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. लाभार्थींनी अधिक माहितीसाठी पंचायत समितीमधील सहायक गट विकास अधिकारी यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.