दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । जिल्हयामध्ये ऊस कारखाना गळीत हंगामासाठी परजिल्हयातुन ऊस तोडणी कामगार त्यांचे पशुधनासह कारखानास्थळी स्थलांतरीत होत असतात व काही कारखान्याच्या ठिकाणी ऊस वाहतूकीसाठी बैलगाडींचा वापर केला जातो, अशावेळी वाहतूकीचे बैल व इतर पशुधन हे स्थलांतरीत कुटुंबासह येत असतात. तरी लंपी चर्म रोगाचे प्रतिबंध व नियंत्रण होण्यासाठी जिल्हयातील साखर कारखान्याच्या ठिकाणी ऊस तोड कामगारांचे कुटुंबासोबत येणारे ज्या पशुधनास लंपी चर्म रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले नाही अशा पशुधनास लसीकरण करुन घेण्यासाठी लगेचच नजीकचे पशुवैदयकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.
ज्या पशुधनास लंपी चर्म रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले आहे अशा पशुधनाचे कुटुंबांनी स्थलांतरीत होणेपुर्वी ज्या ठिकाणी लसीकरण केले आहे तेथील पशुवैदयकीय अधिका-यांचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील.
सातारा जिल्ह्यात फलटण, सातारा, खटाव, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा, जावली व वाई असे 10 तालुक्यातील 148 गावांमध्ये लंम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. आज अखेर गाय 3817 व 482 बैल असे एकूण 4299 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच आज दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हयामध्ये 10 जनावरांचा मृत्यु झाला असून (आजअखेर 201 गायी + 65 बैल असे एकूण 266 पशुधन मृत झाले आ५हे. आजअखेर 1483 गाई व 93 बैल असे एकूण 1576 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली आहे.
लंम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. 20 वी पशुगणनेनुसार जिल्हयातील गोवर्गीय पशुधनाची संख्या 352436 असुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आजअखेर बाधित गाव व बाधित गावाचे ५ किमी परिघातील एकूण 782 गावांमधील गोवर्गीय 196186 व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमधील गोवर्गीय 150914 असे एकूण 347100 पशुधनाचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे. जिल्हयात लंपी चर्म रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण 98.50 टक्के पुर्ण झाले आहे.
लंम्पी चर्म रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.