ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. १८ मार्च २०२२ । मुंबई । मुंबई शहर व उपनगरातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांकरिता मानधन मंजूर करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

शासनामार्फत राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांसाठी मानधन योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत समितीने मानधन मंजूर झालेल्या अ-श्रेणीतील कलावंतांना 3 हजार 150 रूपये, ब-श्रेणीतील कलावंतांना 2 हजार 700 रूपये आणि क-श्रेणीतील कलावंतांना 2 हजार 250 रूपये असे मानधन दरमहा सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत अदा करण्यात येते.  ज्या व्यक्तींनी साहित्य व कला क्षेत्रात मोलाची भर घातली आहे, ज्यांचे वय ५० वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ज्या कलावंत व साहित्यिक यांचे उत्पन्न ४८ हजार रूपयांपेक्षा जास्त नाही. जे कलावंत/ साहित्यिक अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी नाही अशा साहित्यिक व कलावंतांना मानधन मिळण्यासाठी अर्ज करता येईल.

अर्जाचा नमुना www.mahasanskruti.org या वेबसाईटवर तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, महाराष्ट्र शासन, विस्तारभवन, महात्मा गांधी मार्ग, मंत्रालय मुंबई ४०००३२ या कार्यालयातही उपलब्ध असून अर्ज भरल्यानंतर याच कार्यालयात स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी 022-22842634 / 70 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!