दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन


स्थैर्य, 11 मार्च, सातारा :  : दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक सुरक्षेसाठी विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीने सक्षम (अव्यंग व्यक्तीशी विवाह केल्यास रुपये १ लाख ५० हजार एवढे अर्थसहाय्य मिळणार आहे. तर दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास रुपये २ लाख ५० हजार एवढे अर्थसहाय्य मिळणार आहे. अर्थसहाय्याची रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त खात्यात DBT प्रणालीद्वारे हस्तांतरीत होणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे : जोडप्यातील किमान एक व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावी. दिव्यांग व्यक्तीकडे ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र असावे. संबंधित व्यक्तींचा हा प्रथम विवाह असावा. घट स्फोटीत असल्यास अशी मदत यापुर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीर रित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. विवाह झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र. विवाह नोंदणी दाखला. पती व पत्नीचा आधार संलग्न बँक खात्याचा सविस्तर तपशील. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. इच्छुक अर्जदारांनी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर अर्ज करावेत. सदर योजनेचा लाभ दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी व त्यानंतर विवाह झालेल्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, कार्यालयाकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!