
दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । सातारा । घबराटीच्या वातावरणामुळे महिलांच्या मनात निर्माण होणारी भिती घालविण्याच्यादृष्टीने, त्यांची स्वसंरक्षणाची मानसिकता निर्माण करण्याच्या दृष्टीने विशेषत: महिला वर्गाला स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी “ खेळाद्वारे सर्वांसाठी सदृढता ” हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात महिलांसाठी तसेच विद्यार्थींनीसाठी राबवावा.
या कार्यक्रमांतर्गत महिलांकरिता तालुकास्तर व जिल्हास्तरावर तायक्वांदो, कराटे व ज्युदो आदी खेळांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात यावा. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत तालुकानिहाय तज्ञ मार्गदर्शकांची निवड करण्यात आलेली आहे. संबंधित शाळांनी व महाविद्यालयांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन तज्ञ मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली माहे मार्च 2022 अखेर प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवावा असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धनंजय चोपडे व जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.