अवैध सावकारीचा त्रास होतोय? थेट तक्रार करा; जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांचे सातारकरांना आवाहन


सातारा जिल्ह्यात विनापरवाना अवैध सावकारी करणाऱ्यांकडून नागरिकांची पिळवणूक होत असल्यास, संबंधितांनी पुराव्यानिशी गोपनीय तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी केले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १० एप्रिल : सातारा जिल्ह्यात विनापरवाना अवैध सावकारी व्यवसाय फोफावत असल्याच्या अनेक तक्रारी आणि निवेदने प्रशासनाला प्राप्त होत आहेत. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, जर कोणत्याही नागरिकाची अवैध सावकारांकडून पिळवणूक होत असेल, तर त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी केले आहे.

पुराव्यानिशी येथे करा गोपनीय तक्रार

जर एखादी व्यक्ती विनापरवाना बेकायदेशीररीत्या सावकारी व्यवसाय करत असेल आणि त्यातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असेल, तर अशा पीडित नागरिकांनी संबंधित तालुक्यातील ‘सहकारी संस्थांचे सहायक निबंधक’ यांच्याकडे धाव घ्यावी. आपल्याकडील आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि पुराव्यांसह त्यांच्याकडे आपली गोपनीय तक्रार दाखल करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

२०१४ च्या अधिनियमानुसार होणार कडक कारवाई

पीडितांनी केलेल्या तक्रारी व अर्जानुसार ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४’ मधील कडक नियमांन्वये या अवैध सावकारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

“अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडून कर्जवसुलीसाठी पीडित व्यक्तीस जीवे मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे, दमदाटी करणे किंवा शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असेल, तर संबंधितांनी याबाबत घाबरून न जाता नजीकच्या पोलीस ठाण्यातही तातडीने रीतसर तक्रार नोंदवावी,” असेही जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!