दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । सातारा । इतर मागास वर्ग या प्रवर्गातील मुलांसाठी आणि मुलींसाठी 100 प्रवेश क्षमतेची प्रत्येकी एक अशी दोन शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करावयाच्या या वसतिगृहांसाठी सर्व सोईसुविधायुक्त खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री. नितीन उबाळे यांनी केले आहे.
सदर वसतिगृहामध्ये मुला-मुलींचे राहण्याची, जेवणाची व शिक्षणाची सोय शासनामार्फत केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग इमारत भाडे मंजूर करतील त्या दराने इमारत मालक घेण्यास इच्छुक असलेल्या इमारत मालकांची इमारत भाडेतत्वावर घ्यावयाची आहे. सदर इमारतीमध्ये 100 विद्यार्थ्यांची सोय होण्याच्या दृष्टीने स्वयंपाक खोली, स्नानगृहे, स्वच्छतागृहे, विद्यार्थ्यांना वास्तव्यासाठी खोल्या, पुरेशा प्रमाणात पाणी इ. सुविधा आवश्यक आहेत.
वसतिगृहे सुरू होण्याच्या दृष्टीने इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा. दूरध्वनी क्रमांक – 02162-298106 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.