दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । सातारा । परसातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापन करण्याच्या या योजने अंतर्गत सन 2022-2023 करिता खंडाळा, महाबळेश्वर व कराड या तालुक्यांमधून प्रति तालूका 1 या प्रमाणे तीन लाभार्थीची निवड करावयाची आहे.
या योजने अंतर्गत एकूण प्रकल्प किंमत रु.10 लाख 27 हजार 500 असुन सर्व प्रवर्गातील लाभार्थीना शासनाचे पन्नास टक्के अनुदान म्हणजेच रु.5लाख 13 हजार 750, देय असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थीने स्वतःचा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभारावयाची आहे.योजनेच्या लाभासाठी लाभार्थी, अर्जदार यांची वयोमार्यादा 18 ते 60 वर्ष राहील.
या योजनेचा लाभ मिळणेसाठी करावयाचा अर्ज नमूना, जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे व योजनेच्या सविस्तर मार्गदर्शन यासाठी आपले नजीकच्या पंचायत समितीच्या कार्यालयातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. अंकुश परिहार जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, यांनी केले आहे.
या योजनेसाठी अर्ज करणेचा कालावधी हा दिनांक 16 ते 27 जून 2022 असून इच्छूक लाभार्थीनी परिपूर्ण अर्ज भरुन संबंधित पंचायत समिती, पशुसंवर्धन विभागाकडे दि.27 जून 2022 अखेर सादर करण्याची नोंद घ्यावी.