दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाची अधिसुचना 14 मार्च 2017 अन्वये प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी (SPCA), सातारा कार्यान्वीत झाली असून या सोसायटीचे अशासकीय सदस्यांचा तीन वर्षे कार्यकाल संपला असल्याने सोसायटीवर नव्याने अशासकीय सदस्यांची नेमणूक करावयाची आहे. तरी प्राणी कल्याणविषयी कार्य करणाऱ्यां अशासकीय सदस्य होण्यासाठी 20 मे 2022 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पुशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.
यामध्ये जिल्ह्यामधील गोशाळा, पांजरापोळ संस्थेपैकी एक संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याणाविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे 2 सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशन केलेल्या 2 व्यक्ती, जिल्ह्यामधील मानवहितकारक कार्य करणारे, प्राण्यांवर काम करणारे, प्राणी कल्याणासाठी काम करणारे 5 ते 6 कार्यकर्ते असे एकूण 10 ते 11 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या अर्जाबाबत प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी (SPCA), सातारा यांच्यामार्फत शासनास शिफारस करण्यात येवून नियुक्ती झालेल्या दिनांकापासून अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षे राहणार आहे. अर्जाच्या नमुन्यासाठी व अधिकाच्या माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे कार्यालय, गोडोली-सातारा येथे संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. परिहार यांनी केले आहे.