दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । मुंबई । मतदार याद्यांचे प्रमाणीकरण व शुद्धीकरण यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम 1 ऑगस्ट 2022 पासून राज्यभर सुरू झाली आहे. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि बुथ लेव्हल अधिकारी यांच्यामार्फत गरुडा ॲपवरून ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे National Voter Service Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline APP यावरही ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड संलग्न करता येईल. याकामी राजकीय पक्षांनी बूथ लेव्हल असिस्टंट नियुक्त करून ही मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी करायला मदत करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्याण पांढरे, तहसिलदार अर्चना मुळे, तहसीलदार प्रशांत सावंत, नायब तहसिलदार ज्योती खामकर तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी संलग्न करण्यासाठी मतदारांना अर्ज क्र. 6 ब हा फार्म भरायचा आहे. यासाठी फार्म क्रमांक 6 ब सोबत आधार कार्डची छायांकित प्रत जोडून ती बीएलओ कडे देता येईल किंवा एनव्हीएसपी आणि व्होटर हेल्पलाईन ॲपवर ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक मतदार कार्डाशी सलग्न करता येईल, असे जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी सांगितले.
ज्याचे वय वर्षे 18 पूर्ण झाले त्यास मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज क्रमांक 6 भरावा लागेल. यासाठी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरूण तरूणींनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी, सहकारी गृहनिर्माण संस्थांनी देखील या कामी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे स्थलांतरित मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी 6 ए हा फॉर्म भरावा लागेल. मतदार यादीतून नाव वगळणे किंवा त्यावर आक्षेप घेण्यासाठी अर्ज क्रमांक 7 भरावा लागणार आहे. हे अर्ज National Voter Service Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline APP यावरही ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असून मतदारांनी या सुविधेचा उपयोग करावा, असेही श्री. निवतकर यांनी सांगितले.
नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी आता भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी ही वर्षातून 4 वेळा म्हणजेच 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन पोर्टल आणि बीएलओ यांच्या सहकार्याने ही नोंदणी येईल. यूआयडीने देखील आधार कार्ड वरील माहिती अद्ययावत करण्याची मोहीम आता सुरू केली असल्याने त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा आणि मतदार यादीतील नाव अद्यावत आधार कार्डला संलग्न करावे असे श्री. निवतकर यांनी सांगितले.
दि. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. याअंतर्गत दिनांक 4 ऑगस्ट 2022 ते 24 ऑक्टोबर 2022 पर्यंत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, दुबार नोंदणी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे आदी बाबी करण्यात येईल. दिनांक 25 ऑक्टोबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत नमुना 1-8 तयार करून अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. दिनांक 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जातील आणि 26 डिसेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. दिनांक 3 जानेवारी 2023 पर्यंत यादी अंतिम छपाईला पाठविण्यात येईल आणि दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी सांगितले.