दैनिक स्थैर्य । दि.१४ फेब्रुवारी २०२१ । सातारा । जिल्ह्यातील युवक युवतींचे कौशल्य प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभाग,सातारा यांचेमार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्हास्तरीय किमान कौशल्य विकास कार्यक्रम 2021-2022 अंतर्गत वय वर्ष 18 ते 45 असणाऱ्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोविडमुळे कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबातील व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.
या प्रशिक्षण हॉस्पिटॅलीटी अँड टूरिझम, अग्रीकल्चर, फूड प्रोसेसिंग, अॅपरल, ऑटोमोटिव्ह, बँकिंग, इलेक्ट्रॉनिक अँड हार्डवेअर, कॅपिटल गुड्स, आयटी-आयटीइएस, मिडीया अँड एंटरटेनमेंट, लॉजीस्टिक,प्लंबिंग टेलिकॉम, डोमेस्टिक वर्कर, मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांशी निगडीत जॉबरोलचे प्रशिक्षण उमेदवारांच्या पसंतीनुसार जिल्ह्यातील खाजगी प्रशिक्षण संस्थामार्फत मोफत देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना परीक्षेअंती प्रमाणपत्रासोबतच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी देखील प्राप्त होणार आहेत.
अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, एस.टी. स्टॅडजवळ, सातारा. येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा 02162 – 239938 या दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.