अपर्णाच्या मरणोत्तर नेत्रदानाने दोघांना दृष्टी

आंबुळकरवाडीच्या सावंत कुटुंबीयांकडून समाजापुढे आदर्श


स्थैर्य, 23 जानेवारी, सातारा : ’मरावे परि नेत्ररूपी उरावे’ याचे प्रत्यंतर देणारी घटना नुकतीच घडली. मूळच्या आंब्रुळकरवाडी (ता. पाटण) गावच्या; परंतु मानखुर्द (मुंबई) येथे कुटुंबीयांसह वास्तव्यास असलेल्या अपर्णा रघुनाथ सावंत (वय 41) यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक जाणिवेतून त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करून दोन अंध व्यक्तींना नवीन दृष्टी दिली.

अपर्णा यांचे पती रघुनाथ सावंत मुंबईत नोकरीस असतात. चार वर्षांचा स्वराज, 11 वर्षांची सानवी आणि आठ वर्षांची स्वरा या तीन मुलांसह मुंबईतील मानखुर्दला हे कुटुंब वास्तव्यास आहे.

अपर्णा आजारीअसल्याने मुंबईतील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याने पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यापूर्वी अपर्णा यांचे नेत्रदान करण्याचा विचार सावंत कुटुंबीयांच्या मनात आला. नेत्रदानामुळे दोन अंधांना नवी दृष्टी तर मिळेलच शिवाय त्यातून अपर्णा जिवंत असल्याची भावनाही मनात कायम राहील, हा विचार त्यामागे होता. त्यांनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी याबाबत बोलून घेतले व नेत्रदानाचा निर्णय झाला. सावंत कुटुंबीयांच्या संमतीने डॉक्टरांनी अपर्णा यांचे दोन्ही नेत्रपटल काढून अगोदर नोंदणी केलेल्या दोघा अंध व्यक्तींवर त्यांचे प्रत्यारोपण केले. यामुळे त्यांना नवीन दृष्टी मिळाली आहे. दरम्यान, आय बँक समन्वय आणि संशोधन केंद्राकडून सावंत कुटुंबीयांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. डोळे दान करून मानवतेच्या कार्यासाठी दिलेली ही सर्वोत्तम आणि सर्वात मौल्यवान भेट आहे. त्यामुळे अंध बंधू आणि भगिनी सुंदर जगाचा आनंद घेऊ शकतील, असे त्यात नमूद आहे.

नेत्रदान ही मानवी जीवनातील अत्यंत उदात्त, पवित्र व जीवनदायी सामाजिक सेवा आहे. अपर्णाच्या अकाली जाण्याचे दुःख खूप मोठे आहे. मात्र, जाताना ती दुसर्‍याच्या जीवनात प्रकाश निर्माण करून गेली याचे समाधानही आम्हा कुटुंबीयांना आहे.
– रघुनाथ सावंत (पती)


Back to top button
Don`t copy text!