‘आपला गाव वृक्षोत्सव’, ‘हर घर झाड’ हा उपक्रम यशस्वी करावा – डॉ. महेश बर्वे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ६ जुलै २०२३ | फलटण |
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त दि. ११ जुलै २०२३ रोजी फलटण शहर व तालुक्यातील सर्व कुटुंबियांनी आपल्या परिसरात पाच झाडे लावून ‘आपला गाव वृक्षोत्सव’, ‘हर घर झाड’ हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन वृक्षप्रेमी डॉ. महेश बर्वे यांनी केले आहे. आपण एक लाख झाडे लावून आणि टिकवून लोकसंख्या दिवस साजरा करायचा संकल्प करू. आपण आपल्या आवडीची किमान पाच देशी झाडे आपल्या परिसरात लावून त्याची योग्य ती जोपासना करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार सहभागी होऊन परिश्रम घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

फलटणच्या इतिहासात सुवर्णअक्षरात नोंद व्हावी अशा प्रकारचा एक उपक्रम राबवायचा मानस आहे. आपल्या फलटण आणि आसपासच्या सर्व गाव, वाड्या, वस्त्या, खेड्यांना भारताच्या नकाशावर बघायचे एक स्वप्न पाहिले असून लोकसहभागातून विक्रमी वृक्षलागवड करायचा निर्धार आपण सर्वांनीच केला पाहिजे. ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन इथून पुढे ‘फलटण निसर्गोत्सव’ म्हणून कॅलेंडरवर नोंदला गेला पाहिजे. या दिवशी फलटण परिसरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घर, प्रत्येक पेठ, प्रत्येक रस्ता, प्रत्येक वाड्या, प्रत्येक वस्त्या सकाळी हातात झाड घेऊन ते झाड लावतानाचे मनोहारी चित्र पाहायला मिळावे.

एकाच दिवशी, एकाच तासात, एकाच प्रांतात एक लक्ष रोपांना आपल्या भूमातेला अर्पण करून लोकसंख्येएवढी वृक्षसंख्या ह्या आपल्या ध्येयाच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा असल्याचा निर्धार डॉ. बर्वे यांनी व्यक्त केला.
इथून पुढे फलटणची ओळख सांगताना महाराजांच्या आजोळ असण्याचा इतिहास हा इथल्या लोकांच्या हातांनी लागलेल्या झाडांच्या कर्तृत्वाने अजूनच उठून दिसला पाहिजे. एक ध्यास घेऊन ही चळवळ केवळ हरित वसुंधरेसाठी नि:स्वार्थपणे प्रत्येकाने हाती घेतली पाहिजे, तरच येणार्‍या पिढ्यांपिढ्या आपले नाव काढल्याशिवाय राहायच्या नाहीत. त्यासाठी निःपक्ष, निःस्वार्थ असा आपल्या आयुष्यातला एक तास द्यायची तयारी ठेवून आपल्या घराच्या दारात किंवा परसात एक स्वप्न या दिवशी प्रत्येकाने रूजवायचे आहे. असे स्वप्न जे संपूर्णपणे वास्तव आहे, आनंदी आहे, अजरामर आहे. रोज वाढणार्‍या दारा-परसातल्या ह्या लेकराला पंख फुटून ते उडून जायची भीती नाही. जे तहहयात तुमच्या सावलीला उभे असणार आहे. जेवढ्या प्रेमाने लालन-पालन होईल त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

चिरस्थायी असा आनंद मिळवण्यासाठी आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी वर्षातला एक दिवस आपल्या गाव, परिसराचे नाव कायमस्वरूपी सोबत वागविण्याकरता पर्यावरणपूरक वर्तन करणारे सुजाण नागरिक घरोघरी निर्माण होवोत, अशी अपेक्षा व्यक्त करून ११ जुलै रोजी फलटण शहर व तालुक्यातील सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प यशस्वी करावा, असे अवाहनही डॉ. महेश बर्वे यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!