दैनिक स्थैर्य | दि. १४ मार्च २०२३ | फलटण |
कोणताही धर्म मूलत: चांगलाच असतो, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालय फलटणच्या इंग्रजी विभागाचे प्रा. फिरोज शेख यांनी केले.
प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनी आणि तत्त्वज्ञान विभाग मुधोजी महाविद्यालय फलटण यांच्या व्याख्यानमालेत ‘इस्लाम धर्मातील नीतीमूल्ये’ या विषयावर बोलताना मुधोजी महाविद्यालय फलटणच्या इंग्रजी विभागाचे प्रा. फिरोज शेख यांनी प्रामाणिकपणा, दया, समता, बंधूता, सहिष्णुता, संयम आणि धैर्य या मूल्यांवर सांगोपांग विवेचन केले. त्याचबरोबर इमान, नमाज, हज, जकात इत्यादी आयामांची श्रद्धाभावाशी निगडित व्यक्तिगत व्रतनिष्ठ मूल्यांची यथोचित मांडणी केली.
प्रा. शेख यांनी पुढे बोलताना सांगितले की, कोणताही धर्म मूलत: चांगलाच असतो. मानवी कल्याणासाठीच सांगितला जातो. त्यांनी इस्लाम, जिहाद याअनुषंगाने ही आपली मांडणी केली. त्यामुळे इस्लाम धर्माचे मूल्यात्मक स्वरूप उपस्थित बुद्धिजीवी वर्गापुढे आले. तसेच त्यांनी मोहम्मद पैगंबर यांचे जीवन आणि चिंतन याविषयी तत्कालीन सामाजिक संदर्भात मांडणी केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी म्हणाले की, विशेष आणि व्यापक शैलीतून प्रेषितालाच पैगंबर म्हणतात. सर्वधर्म चांगलेच आहेत. श्रेष्ठ, कनिष्ठ असा कोणताच धर्म नाही. सर्व धर्मातून जे काही सांगितले आहे त्यालाच आपण ‘मानवता धर्म’ असे म्हणू शकतो, असे सांगितले. व्याख्यानानंतर प्राध्यापक शेख यांनी काही शंकांचे समाधानकारक विमोचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि प्रबोधिनी चेअरमन डॉ. नवनाथ रासकर यांनी केले, तर आभार प्रा. विलास टिळेकर यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. अभिजीत धुलगुडे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय दीक्षित आणि सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी उपस्थित होते.