
स्थैर्य, मुंबई, दि.२३: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप झाल्यावर इंडस्ट्रीतील अनेक लोक त्याच्या बचावासाठी समोर आले आहेत. त्यामध्ये त्याच्या पुर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नीसह अभिनेत्री आणि सहका-यांचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणावर अनुरागचा जुना सहकारी दिग्दर्शक जयदीप सरकार याने प्रतिक्रिया दिली असून एका अभिनेत्रीने अनुरागकडे कास्टिंग काऊचच्या बदल्यात काम मागितले होते, हा खुलासा केला आहे.
जयदीप सरकारने ट्विट करुन सांगितले की, ‘2004 मध्ये मी अनुरागचा असिस्टंट म्हणून काम करत होतो. आम्ही गुलाल या चित्रपटासाठी कलाकारांचे ऑडिशन घेत होतो. त्यावेळी एका तरुणीने अनुरागकडे भेटण्यासाठी वेळ मागितला. तिला या चित्रपटात काम हवे होते. तिने वारंवार आपल्या साडीचा पदर खाली पाडून कास्टिंग काऊचच्या बदल्यात काम मागितले होते. परंतु अनुरागने तिच्याकडे लक्ष दिले नाही. अनुरागने तिला म्हटले की, जर तू या भूमिकेत फिट बसली तरच तुला संधी मिळेल अन्यथा नाही,’ असा किस्सा सांगून जयदीपने अनुरागला पाठिंबा दिला आहे.
अनुरागने माझा लैंगिक छळ केला, तसंच अभद्र भाषेचाही वापर केला, असा आरोप पायल घोषने केला आहे. एका मुलाखतीत पायलने तिची आपबिती कथन केली.
तिने सांगितल्यानुसार, “मी अनुराग यांना भेटायला त्यांच्या यारी रोड इथल्या ऑफिसमध्ये गेली होती. ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत होते म्हणून मी परत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि बोलावले. काही ग्लॅमरस घालू नको असे त्यांनी सांगितले. म्हणून मी सलवार कमीज घालून त्यांना भेटायला गेले. त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी जेवण बनवले, आमचे जेवण झाल्यानंतर त्यांनी माझी जेवणाची प्लेटही उचलली. त्यानंतर मी तिथून निघून आले. त्यांनी मला पुन्हा मेसेज करून बोलावले. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता म्हणून मी त्यांना भेटायला नाही येऊ शकत असे सांगितले.” यानंतर दोन-तीन दिवसांनी मी अनुराग यांना पुन्हा भेटले, यावेळी मी त्यांच्या घरी गेले होते, असे पायलने सांगितले.
पायल म्हणाली, “त्यांनी मला घरी बोलावले होते. ते स्मोकिंग करत होते, मी तिथे बसले होते. त्यानंतर अनुराग यांनी मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक ते माझ्यासमोर न्यूड झाले आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्यांना म्हटले मला कन्फर्टेबल वाटत नाहीये, यावर ते मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाले. मी पुन्हा त्यांना सांगितले, मला अस्वस्थ वाटतंय. काही तरी करून मी तिथून कसाबसा पळ काढला. त्यानंतर मी त्यांना कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावले. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो”, असे पायल म्हणाली.