स्थैर्य, फलटण, दि. ८ : येथील नगरसेविका सौ. मनिषा किशोर घोलप व सौ. ज्योत्स्ना अनिल शिरतोडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बंडखोर नगरसेवक अनुप शहा यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उद्या मंगळवार (दि. 9) रोजी सुनावणी ठेवली आहे. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. 9) रोजी दुपारी 3 वाजता ही सुनावणी ठेवली आहे.
गत सहा महिन्यांपासून सौ. मनिषा किशोर घोलप या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांना गैरहजर असल्याने त्यांच्यावर नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 44 (1) (ड) अन्वये सौ. घोलप यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी तक्रार मे 2019 मध्ये शहा यांनी केली होती. त्याचबरोबर सौ. ज्योत्स्ना अनिल शिरतोडे यांचे पती अनिल शिरतोडे यांनी बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी त्यांच्यावर नगरपालिका अधिनियम अन्वये सौ. शिरतोडे यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी तक्रार शहा यांनी केली होती. या अनुषंगाने मुख्याधिकार्यांनी दिलेला अहवाल जिल्हाधिकार्यांना प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी उद्या सुनावणी ठेवली आहे.