महानुभावपंथीय मठांना घरपट्टीमध्ये सवलत मिळवून दिल्याबद्दल अनुप शहा यांचा सत्कार


दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
महानुभाव पंथाच्या मठांना नगरपरिषद घरपट्टी करामध्ये सवलत मिळवून दिल्याबद्दल महानुभावपंथीय सर्व साधूसंत मठपरिवाराच्या वतीने भाजप फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांचा सत्कार करण्यात आला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व अनुप शहा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही सवलत प्राप्त झाली आहे.

अनुप शहा यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री श्यामसुंदर शास्त्री विध्वंस म्हणाले की, अनुप शहा यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून पंथाची केलेली सेवा सर्वांच्या लक्षात राहणारी असून त्यांचे कार्य असेच पुढे चालू राहावे, असा शुभाशिर्वाद देण्यासाठी हा सत्कार करण्यात आला आहे. गेली पंचवीस-तीस वर्ष मागणी करूनसुद्धा महानुभावपंथीय मठांना करसवलत मिळत नव्हती. ती कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींचा अभ्यास करून नियमानुसार सर्वच धार्मिक मठांना अनुप शहा यांनी मिळवून दिली असून त्यांचे कार्य असेच वाढत राहो, ही शुभेच्छा.

यावेळी महंत श्री गोविंदराज लांडगे, महंत भरत विध्वंस, चक्रधर विध्वंस, अभी सिन्नरकर, श्री. परसराज जामोदेकर, महंत श्री. मुकूंदराज बिडकर, अमोल लांडगे, नरेंद्र लांडगे, अक्षय विध्वंस, कृष्णराज लासुरकर, शहाजी जामोदेकर, युवाआचार्य श्री. प्रकाश मामा, श्री. श्याम जामोदेकर, श्री. गौरवराज शेवलीकर, श्री. अमित कपाटे, श्री. आसेगावकर, बाबा हरिराज शास्त्री विध्वंस यांच्यासह मोठ्या प्रमाणात महानुभाव पंथाचे साधुसंत, अनुयायी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!