दैनिक स्थैर्य । दि. २२ फेब्रुवारी २०२३ । सातारा । तंबाखूचे दुष्परिणाम आणि वाढते कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी जनजागृती व लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी केले. साताऱ्यात तंबाखू विरोधी जनजागृती अभियानाचा शुभारंभ श्री. आवटे यांच्या हस्ते चित्ररथाचे उद्घाटन व कोटपा 2003 कायद्याच्या फलकाचे अनावरण करुन करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या सल्लागार डॉ. दिव्या परदेशी-कोठेकर, मानसशास्त्रज्ञ दीपाली जगताप आदी उपस्थित होते.
तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि त्याचा भावी पिढीवर होणारा दुष्परीणाम याविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी श्री. आवटे म्हणाले, लोकांना तंबाखूच्या सेवनापासून परावृत्त करण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. सर्व शासकीय कर्यालये, शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये शासन धोरणानुसार तंबाखू सेवनावरील व विक्री विषयीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे धोरण आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूचे सेवन केले जाणार नाही याविषयी प्रबोधनही या आभियानाच्या माध्यमातून केले जाणार आहे. या अभियानास सर्व शासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांनी सक्रीय सहकार्य करावे असे आवाहनी त्यांनी केले.
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या वतीने सातारा शहरात तीन दिवस चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे.