उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२३ । मुंबई । राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे समर्थक दीपक सावंत यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दीपक सावंत यांच्या स्वरुपात उद्धव ठाकरेंना गेल्या दोन दिवसात दुसरा मोठा धक्का बसला आहे. याआधी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी केंद्रीय मंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. आता दीपक सावंत यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

डॉ. दीपक सावंत यांनी दुर्गम भागात शिवसेनेसाठी मोठं काम केलं आहे. आरोग्यमंत्री असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना सेवा दिली. कमी बोलणारे आणि प्रसिद्धीपासून दूर राहून जास्त काम करणारे अशी त्यांची ओळख आहे. कोरोना काळातही त्यांनी चांगलं काम केलं होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जानेवारी २०१९ मध्ये डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांना डच्चू दिला होता. दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये त्यावेळी नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती त्यावेळी पुढे आली होती.


Back to top button
Don`t copy text!