
स्थैर्य, फलटण, दि. १६ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजे गटाला गळतीचे सत्र सुरूच असून, आज पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचे माजी उपसंचालक अनिल मारुतराव चोरमले आणि संभाजी साहेबराव चोरमले यांनी राजे गटाला रामराम करत शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सोमशेठ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अनिल चोरमले, संभाजी चोरमले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
अनिल चोरमले हे राज्य शासनाच्या क्रीडा विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि सामाजिक क्षेत्रातील जनसंपर्क मोठा आहे. तसेच संभाजी चोरमले यांचाही स्थानिक राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय सहभाग आहे. या दोघांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीची ताकद वाढली आहे.
गेल्या काही दिवसांत राजे गटातील अनेक दिग्गज नेते, माजी नगराध्यक्ष आणि सुकाणू समितीचे सदस्य महायुतीत सहभागी झाले आहेत. आता चोरमले यांच्या रूपाने आणखी दोन महत्त्वाचे शिलेदार गट सोडून गेल्याने राजे गटासमोरील अडचणी वाढल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पक्षविस्ताराची मोहीम तीव्र केली आहे.
विकासाच्या मुद्द्यावर आणि सक्षम नेतृत्वामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी अनिल चोरमले यांनी सांगितले. आगामी काळात पक्षाचे काम जोमाने करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या प्रवेशामुळे संबंधित प्रभागातील राजकीय समीकरणे बदलणार असून, महायुतीला याचा फायदा होईल, असा विश्वास सोमशेठ जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या प्रवेश सोहळ्याला शक्तीप्रदर्शनाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

