
स्थैर्य, फलटण, दि. २५ : शहराच्या मध्यवर्ती भागात, माळजाई उद्याना समोरील प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनाच्या पाठीमागील जागेत सभागृह/मंगल कार्यालय व दुकान गाळ्यांसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये १०० बेडचे सर्व सोयी सुविधांनी युक्त कोविड रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने पाहणी केल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
फलटण नगर परिषद सर्वसाधारण सभेत शहरात कोविड रुग्णालय उभारणी कामी इमारत उपलब्धतेबाबत ठराव मंजूर झाल्यानंतर नगराध्यक्षा सौ. निताताई मिलींद नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, सर्व नगरसेवक/नगरसेविका, मुख्याधिकारी प्रसाद काटकर व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने कार्यवाही करुन रुग्णालयासाठी आवश्यक इमारत, पुरेशी स्वच्छता गृह, वीज जोडणी व फिटिंग, पाण्याची व्यवस्था, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, गरज पडल्यास बाहेर गावच्या रुग्णांचे नातेवाइकांसाठी लगत दोन स्वतंत्र खोल्या आदी कामे अंतीम टप्प्यात सुरु असून आगामी सप्ताहात सदर इमारत पूर्ण होईल याची ग्वाही यावेळी नगर परिषद प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे.
फलटण शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालये पुरेशी होत नसल्याने ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नगर परिषदेस या सभागृहात १०० बेडचे सर्व साधने सुविधांनी युक्त कोविड रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने इमारत तातडीने तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यानुसार नगर परिषद सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन सदर इमारतीचे सुरु असलेले अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने अवघ्या सप्ताहात अपूर्ण कामाची पूर्तता करण्यात आल्याचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची या इमारती मध्ये १०० बेडचे कोरोना उपचार केंद्र (हॉस्पिटल) उभारणी बाबत चर्चा झाली असून लवकरच जिल्हाधिकारी सदर इमारतीची पाहणी करुन पुढील कार्यवाही करणार असल्याचे समजते. १०० बेड पैकी ८० बेड ऑक्सिजन सुविधा व २० बेडचे आयसीयू उभारण्याचे नियोजन असून उप जिल्हा रुग्णालयातील ४० आणि हे १०० असे १४० बेडची दोन्ही हॉस्पिटल्स फलटणकरांसाठी खाजगी हॉस्पिटल्सच्या जोडीला उपलब्ध होणार आहेत.
नगर परिषदेने इमारत, पाणी, वीज, स्वच्छता गृह आणि या इमारती शेजारी रुग्णांच्या नातेवाइकांसाठी दोन खोल्या उपलब्ध करुन दिल्या आहेत.
नगर परिषदेने फलटण-शिंगणापूर रोडवरील नगर परिषद मालकीच्या जुन्या सध्या वापरात नसलेल्या विद्यार्थीनी वसतीगृहाच्या जागेत यापूर्वीच कोविड रुग्णालयाची उभारणी नगर परिषद व शहरातील काही डॉक्टर्स आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने केली आहे. सुमारे ४० बेडच्या या रुग्णालयात ऑक्सीजन व गरज पडल्यास व्हेंटीलेटर सुविधा उपलब्ध असल्याचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी निदर्शनास आणून दिले.