दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२५ | फलटण |
गुणवरे (तालुका फलटण) ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ‘स्पोर्ट डे’ मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हिंदू गर्जना केसरी पैलवान निलेश लोखंडे तसेच महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान जयदीप गायकवाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संभाजी गावडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्याना खेळाची प्रतिज्ञा देण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते टॉर्च लॅम्प मैदानामध्ये फिरवून खेळाचे वातावरण निर्माण केले.
शाळेचे प्राचार्य गिरीधर गावडे यांनी प्रस्ताविकामध्ये शाळा दरवर्षी नवनवीन खेळांचे उपक्रम राबवत असते. चालू वर्षी शाळेने व्हॉलीबॉल, रस्सीखेच, चेस अशा नवीन खेळांचा समावेश केला आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सुधारते व विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सुदृढ, मानसिकदृष्ट्या खंबीर बनून बौद्धिकतेत विद्यार्थी चपळ बनतो. जीवनामध्ये संघर्ष करण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये खेळामुळे निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे म्हणाले की, खेळामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक ताण कमी होऊन विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व नेतृत्वगुण निर्माण होतात. शालेय स्पर्धा ह्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जाण्याचं माध्यम आहे. शासकीय सेवेमध्ये चांगले अधिकारी होण्यासाठीसुद्धा खेळ विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. म्हणून पालकांनीही आपल्या पाल्यांवर चांगला खेळाडू घडवण्यासाठी लक्ष द्यावे, असे पालकांना आवाहन केले.
स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे हिंदू गर्जना केसरी पैलवान निलेश लोखंडे व महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान जयदीप गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये रनिंग, रिंगरेस, बॉलरेस, सूर्यनमस्कार, योगासन, कुस्ती, गोळाफेक, लांबउडी, बुद्धिबळ, खो – खो, व्हॉलीबॉल, रस्सीखेच यासारख्या वैयक्तिक तसेच सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
समारोप समारंभात विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्रमुख पाहुणे तसेच संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष ईश्वर गावडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे, संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे, यांनी खेळाडूंचे कौतुक तसेच अभिनंदन केले. हा क्रीडा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशालेचे विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन इयत्ता नववीतील आदिती शेडगे व सोनिया निकम यांनी केले.
स्पर्धेतील प्रत्येक खेळाची कॉमेंट्री इयत्ता दहावीतील सिद्धी पिसाळ, तेजस्विनी ठणके, सुजित नलावडे व प्रणव माळशिकारे यांनी केली.
महोत्सवामध्ये पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी महिला तसेच पुरुष पालक वर्गासाठी संगीत खुर्ची, रस्सीखेच असे खेळ घेण्यात आले. या खेळांमध्ये पालक वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता.
कार्यक्रमादरम्यान महिला वर्गासाठी राबवण्यात आलेला हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडला.