दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२४ | फलटण | ‘‘वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव शिक्षण संस्थेकडून केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो. नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही तर व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा चांगला उपयोग होतो. विद्यार्थ्यांचे विविध कलागुण पाहून प्रोग्रेसिव्हच्या विद्यार्थ्यांचे भविष्य नक्कीच उज्वल असेल’’, असे मत माजी आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
गुणवरे (ता. फलटण) येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुणवरे, येथे शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक चव्हाण बोलत होते. कार्यक्रमास माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, महात्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब चोरमले, रयत शिक्षण संस्थेच्या रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक साताराचे चेअरमन राजेंद्र शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे सातारा जिल्हा प्रवक्ते शंभूराज खलाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गावडे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे संचालक नितीन, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे, सौ. वैशाली चोरमले, युवा उद्योजक श्रेयस कदम, रामराजे मोटार वाहतूक संघटनेचे माजी चेअरमन शिवाजीराव लंगुटे, खाशाबा जाधव, शिवसेनेचे विकास नाळे, सचिन वाघमोडे, मनोज पवार, सौ. पूनम पवार, सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार व सौ. सुलोचना पवार, संस्थेचे सचिव विशाल पवार तसेच संस्थेच्या कार्यकारी संचालिका सौ. प्रियांका पवार आदींची उपस्थिती होती.
स्नेहसंमेलन कार्यक्रमात पूर्व प्राथमिक विभागातील नर्सरी ते युकेजी, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी कोळीगीत, धनगर गीत, लावणी, पंजाबी, शेतकरी गीत, गोंधळ, इंग्लिश गाणी यासारख्या विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करत आपल्या कला दाखवल्या. स्नेहसंमेलनाचा आकर्षक ठरलेल्या कांतारा या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तसेच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘फू बाई फू’ कॉमेडी नाटक सादर केले. तसेच इयत्ता चौथी ते नववीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘अफजलखानाचा वध’ या ऐतिहासिक नाटिकेने सर्व प्रेक्षकांना भारावून टाकले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनींनी भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या सुपरहिट हिंदी गाण्यांवर नृत्य करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमातील प्रत्येक नृत्याच्या सादरीकरणाबद्दल पालकांकडून आशीर्वाद रुपी बक्षीस मिळाले. कार्यक्रमात पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुलांच्या या वेगवेगळ्या कलागुणांबद्दल पालकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन प्रशालेचे विद्यमान प्राचार्य किरण भोसले, उपप्राचार्या सौ. स्वरदा जाधव यांच्या नेतृत्त्वात सर्व शिक्षक वृंदांनी केले.
प्रास्ताविक सचिव विशाल पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रशालेच्या समन्वयीका सौ. सुप्रिया सपकाळ व शिक्षिका सौ.उषा आडके यांनी केले.