
दैनिक स्थैर्य | दि. १० फेब्रुवारी २०२३ | कोळकी |
वार्षिक स्नेहसंमेलने विद्यार्थ्यांसाठी आनंद सोहळा असतो. या ठिकाणी त्यांच्या आवडीनुसार त्यांना कला सादर करण्याची संधी मिळते.अर्थातच त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यास असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी केले.
फलटण येथील श्री सद्गुरू हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, अध्यक्ष तुषार गांधी होते. यावेळी संस्थेचे संचालक रणजितसिंह भोसले, ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासकीय संचालिका प्रियदर्शनी भोसले, प्राचार्य प्रफुल्ल आडागळे, श्री सद्गुरू व महाराज या उद्योग समूहाचे सीईओ संदीप जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजच्या स्थितीत सभोवताली घडणार्या कोणत्याही मोहाला बळी न पडता मुलांनी ज्ञान संपादन करण्याबाबतची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी. म्हणजे आयुष्याच्या ठरविलेल्या ध्येयापर्यंत पोहचणे शक्य होते. तसेच अशा कार्यक्रमांतून विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.उद्याचे सुजाण नागरिक निर्माण होतात, असेही कोळेकर मॅडम यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी क्रिडा स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. देशभक्तीपर गीते आदी कलाकृतींनी मान्यवरांसह उपस्थित पालकांची वाहवा मिळविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी केले. शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. सौ. मधुबाला भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले व प्रास्ताविक केले. प्रदीप चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.