दैनिक स्थैर्य | दि. २२ मार्च २०२३ | फलटण |
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या शिखर शिंगणापूरची वार्षिक चैत्र यात्रा आज बुधवार, २२ मार्च २०२३ ते गुरुवार ६ एप्रिल अखेर संपन्न होत आहे.
यात्रेनिमित्त बुधवार, २२ मार्च प्रतिपदेला गुढीपाडवा असून गुढी उभारून शिव-पार्वती यांच्या लग्नाचा मुहूर्त केला जातो. रविवार, २६ मार्च रोजी पंचमीला शिव-पार्वती हळदी सोहळा संपन्न होईल.
सोमवार, दि. २७ मार्च रोजी षष्ठी असून महापूजा, अभिषेक होईल. मंगळवार, दि. २८ मार्च सप्तमीला महापूजा, अभिषेक होईल. बुधवार, २९ मार्च रोजी अष्टमीला सायं. ४.०० ते ६.०० वाजेदरम्यान ध्वज (पागोटे) दोन्ही मंदिराच्या कळसाला बांधण्याचा कार्यक्रम, रात्री १२ वाजता शंकर-पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. गुरुवार, दि. ३० मार्च नवमीला रामनवमी, शुक्रवार दि. ३१ मार्च दशमीला महापूजा व अभिषेक होईल.
शनिवार, दि. १ एप्रिल एकादशीला घोड्यावरून इंदोरच्या राजाची स्वारी, रविवार, दि. २ एप्रिल द्वादषी (बारस) ला हर हर महादेव ऽऽऽऽऽ च्या गजरात मुंगी घाटातून कावडी सोहळा मंदिराकडे जाईल. रात्री २ वाजता देवावर कावडीच्या पाण्याने हर हर महादेव ऽऽऽऽऽ च्या गजरात धार व अभिषेक संपन्न होणार आहे.
सोमवार, दि. ३ एप्रिल त्रयोदशीला प्रदोष सोमवार एकत्र (सोम प्रदोष) बुधवार, दि. ५ एप्रिल रोजी चतुर्दशी महापूजा व अभिषेक आणि गुरुवार, दि. ६ एप्रिल रोजी पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव व यात्रेची सांगता होणार आहे.