स्थैर्य, फलटण : प्रखर सामाजिक भान, निःस्पृह पत्रकारिता, आणि मराठी भाषा – संस्कृतीविषयी जाज्ज्वल्य अभिमान यांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने निधन झाले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो की, स्वराज्यात मराठी भाषेवरील अन्यायाविरोधात दाद मागणारे आंदोलन असो दिनू रणदिवे नेहमीच पत्रकार आणि मराठीप्रेमी नागरिक म्हणून मराठीच्या बाजूने सक्रिय राहिले होते. अभ्यासू आणि निःस्पृह पत्रकार म्हणून त्यांनी केलेले कार्य थोर आहेच पण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. त्यांच्या ह्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि मराठी भाषा, संस्कृती यांच्या संवर्धनासाठी नवोदित पत्रकारांना प्रेरणा मिळावी यासाठी मराठी अभ्यास केंद्राने पुढील वर्षापासून दिनू रणदिवे मराठीस्नेही पत्रकारिता पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार दर वर्षी मराठी भाषा दिनाला केंद्राच्या अन्य भाषा पुरस्कारांसोबत समारंभपूर्वक दिला जाईल. ह्या पुरस्कारासाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, ऑनलाईन माध्यमे अशा सर्व क्षेत्रांचा विचार केला जाईल, अशी माहिती मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. प्रकाश परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.