दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२३ | फलटण |
फलटण तहसील कार्यालयाकडून फलटण तालुक्यातील रिक्त सजांच्या कोतवाल नेमणुकीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार या सजांमध्ये निघालेल्या प्रवर्गानुसार कोतवालांची नेमणूक केली जाणार आहे. ज्या व्यक्तीस कोतवाल म्हणून काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी फलटण तहसीलदार कार्यालयात २० जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून ते दिनांक २८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६.०० (सुट्टीचे दिवस वगळून) वाजेपर्यंत समक्ष पोहोच होईल अशा रितीने विहीत नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा.
कोतवाल पद नियुक्तीसाठी जात प्रवर्गाचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे – गुणवरे (अनूसूचित जाती महिला), साठे (अनुसूचित जाती), गोखळी (अनुसूचित जमाती), वाठार निं. (इतर मागास वर्ग महिला), होळ (इतर मागास वर्ग), राजुरी (आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक महिला), तडवळे (आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक), खामगाव (सर्वसाधारण / खुला महिला), वडले (सर्वसाधारण / खुला महिला), हिंगणगाव (सर्वसाधारण / खुला), गिरवी (सर्वसाधारण/खुला), तरडगाव (सर्वसाधारण / खुला), कुसूर (सर्वसाधारण / खुला), धूळदेव (सर्वसाधारण / खुला).
कोतवाल पदाच्या भरतीसाठी उमेदवार किमान ४ थी उत्तीर्ण असावा व त्यास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे. वयोमर्यादा सर्व प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जाहीरनामा प्रसिध्द होणार्या दिनांकात म्हणजे दि. १८ जुलै २०२३ रोजी किमान १८ वर्षे व कमाल ४० वर्षे असावी.
उमेदवार संबंधित सजामध्ये राहणारा असावा व तो त्याच्या नेमणुकीच्या गावी राहण्यास तयार असला पाहिजे.
सामाजिक आरक्षणांतर्गत राखीव जागांच्या बाबतीत अर्जदाराला सक्षम प्राधिकार्याने दिलेला जातीचा / प्रवर्गाचा दाखला आणि नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र (लागू असेल तेथे) यांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.
मागासवर्गीय उमेदवारांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले मूळ जात प्रमाणपत्र व मूळ जात वैधता प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक राहील.
अर्जदारावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल नसावा. अथवा कोणत्याही फौजदारी गुन्ह्यात शिक्षा / दंड झालेला नसावा. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनी निवडीनंतर एक महिन्याच्या आत पोलीस निरीक्षक यांचा चारित्र्य पडताळणी दाखला सादर करणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असावे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनी निवडीनंतर एक महिन्याच्या आत शारीरिक क्षमतेबाबतचे सातारा जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडील वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या दराने व नियमानुसार देय असलेले मानधन तसेच वेळोवेळी देय केलेल्या सवलती कोतवाल पदास अनुज्ञेय असतील.
उमेदवाराची नियुक्ती केवळ तात्पुरत्या स्वरूपाची राहील.
अर्ज हा कार्यालयाने ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यातच असावा. अर्ज तहसील कार्यालय फलटण येथे शुल्क रू. ५/- इतके भरून मिळेल. सदर अर्जावर र.रू. ५/- कोर्ट स्टॅम्प फी लावणे आवश्यक आहे. अन्यथा असा अर्ज फेटाळण्यात येईल.
कोतवाल पदाकरीता इयत्ता चौथी उत्तीर्ण गुणपत्रिका किंवा महत्तम प्राप्त शैक्षणिक गुणवत्ता दर्शविणारी गुणपत्रिका/सनद आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा उल्लेख असलेले बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा १० वी सनद किंवा जन्मदाखला.
सजातील रहिवासी असल्याबाबत तलाठी अथवा ग्रामसेवक यांचा दाखला आवश्यक आहे.
अर्जासोबत आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड यापैकी कोणत्याही एका ओळखपत्राची स्वसाक्षांकित प्रत जोडावी.
कोतवालांचे वारस असल्यास याबाबत पुरावा जोडावा. सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती साक्षांकित करून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (महिलांसह) रू. ५००/- राहील. तसेच अ.ज., अ.जा., इ.मा.व. व ईडब्लूएस उमेदवारांसाठी (महिलांसह) रू. ३००/- राहील.
परीक्षा शुल्क हे डी.डी. साठी लागणारे बँकेचे शुल्क/सेवाकर इ. वगळून आहे.
वरीलप्रमाणे परीक्षा शुल्क ‘तहसीलदार फलटण’ या नावाने कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेेचे फलटण येथे देय असणारे डी.डी. (डिमांड ड्राफ्ट) अर्जासोबत सादर करावा.
कोतवाल पदासाठी १०० गुणांची लेखी परीक्षा असेल. लेखी परीक्षा ६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० यादरम्यान प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल.
लेखी प्रश्नपत्रिका इयत्ता चौथीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. सदर प्रश्नपत्रिकेत एकूण ५० प्रश्न असून प्रत्येक बरोबर उत्तरासाठी २ गुण मिळतील. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा होणार नाहीत.
परीक्षेचा निकाल व प्राथमिक निवड सूची बुधवार, दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीर करण्यात येईल. प्राथमिक निवड सूचीतील पात्र उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी गुरुवार,ि द. १० ऑगस्ट २०२३ रोजी होईल.
अंतिम निवडसूची आणि प्रतीक्षाधीन उमेदवारांची यादी शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येईल.