दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२१ । सातारा । खिंडवाडी येथे १७ नोव्हेंबर तारखेला झालेला अमोल डोंगरे ह्या तरुणाचा खून हा नरबळी असल्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. त्या आधारे पोलिसांनी ह्या घटने मध्ये नरबळीच्या शक्यतेचा कसून तपास करावा आणि पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा असे निवेदन सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाला डॉ हमीद दाभोलकर प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, हौसेराव धुमाळ, वंदना माने, शंकर कणसे यांनी म. अंनिस मार्फत दिले आहे.
अमोल डोंगरे यांचे बंधू भागवत डोंगरे राहणार कोठरबन तालुका वडवणी जिल्हा बीड यांनी अनिसला संपर्क करून दिलेल्या तक्रार अर्जाच्या नुसार मंअनिस कार्यकर्त्यांनी ह्या विषयी सखोल चौकशी केली असता असे समोर आले आहे कि मधुकर सोनावणे हा खून प्रकरणात सापडलेला आरोपी स्वत: मांत्रिक म्हणून कोठरबन ता.वडवणी जि. बीड येथेकार्यरत होता. त्याच्या कडे दैवी शक्ती असून तो तंत्र मंत्र विद्या जाणतो असे तो म्हणत असे आणि लोकांना भूत उतरवणे , खजिना शोधणे अशा गोष्टींच्या साठी मदत करण्याचे दावे करून फसवत असे अशी माहिती समोर आली आहे. मुळचे बीड कोठरबनचे रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जावळे आणि श्री केशव वाघमारे ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार संशयित आरोपी मधुकर सोनावणे हा त्या गावात गेले काही महिने समुद्रातील सोने काढून देतो असे सांगून लोकांची फसवणूक करीत होत आणि त्या योगे एखाद्या व्यक्तीला मोहात पडून त्याला बळी देण्याचे त्याचे मनसुबे होते. असा संशय गावात व्यक्त केला जात आहे.
अशी कोणती व्यक्ती सहजी न भेटल्यामुळे अमोल डोंगरे ह्याचे ट्रान्सपोर्ट व्यवसायातील सहकारी सुनील रखमाजी डोंगरे ह्यांना सोबत घेवून मनोहर सोनावणे ह्यांनी अमोल डोंगरे ह्याच्या खुनाचे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात देखील त्यांनी ह्याची वाच्यता केली आहे. तसेच अमोल डोंगरे ह्याचा खून केल्याने आपण आता अमर झालो. अमोल डोंगरे माझ्या राशीला आला होता म्हणून त्याला ठार मारले अशी विधाने संशयित आरोपीकडून केली गेली आहेत. तसेच खुनाच्या नंतर अमोल डोंगरे ह्यांच्या मृत देहाच्या पायाला बिबा बांधून त्याला लिंब खिंडी जवळच्या खाणीत टाकण्यात आले होते. ह्या पार्श्वभूमीवर अमोल डोंगरे खून प्रकरणात नरबळीच्या शक्यतेचा विचार करून पोलीस दलाने कसून चौकशी करावी आणि संशयित आरोपीना जादूटोणा विरोधी कायद्याची कलमे देखील लावावीत अशी मागणी म. अंनिस मार्फत करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अजून देखील मोठ्या प्रमाणात अघोरी विद्या, करणी राशीला येणे ह्या सर्व मानवी मनाच्या कल्पना मानणारे लोक असून त्या मधून अशा भोंदू बाबा बुवांचे फावते आणि त्या मधून नरबळी सारख्या मानवी संकृतीला काळिमा फासणाऱ्या घटना अजून देखील घडत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेणे आवश्यक असून अनेक वर्ष प्रलंबित असलेले जादूटोणा विरोधी कायद्यातील नियम तातडीने तयार करणे आणि दक्षता अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे असे देखील ह्या पत्रकात नमूद केले आहे.
मंत्र-तंत्र करणे करणी राशीला येणे ह्या सर्व मानवी कल्पना असून प्रत्यक्षात असे काही नसते. आपल्या आयुष्यामध्ये चांगले किंवा वाईट घडण्यामध्ये याचा काहीही वाटा नसतो. ह्या विषयी समाजात अजून मोठ्या प्रमाणत प्रबोधन करण्याची गरज ह्या घटने मुळे अधोरेखील होत आहे आणि ह्या विषयी मं. अनिस प्रबोधन मोहीम राबवेल असे देखील ह्या पत्रकात नमूद केले आहे.