
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने मराठा समाजातील १.७७ लाख तरुणांना स्वयंरोजगारासाठी १,६७० कोटींचा व्याज परतावा दिला आहे. लाभार्थ्यांच्या सोयीसाठी आता ‘स्मार्ट बॉट’, व्हॉट्सॲप सेवा आणि पनवेल येथे अत्याधुनिक मुख्यालय उभारण्यात येणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 11 एप्रिल : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘व्याज परतावा योजना’ अत्यंत प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे राबविली जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करत महामंडळाने आजवर १ लाख ७७ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली असून, तब्बल १,६७० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक साहाय्य व्याज परताव्याच्या स्वरूपात वितरित केले आहे.
वाढत्या लाभार्थ्यांची संख्या आणि त्यांच्या गरजा लक्षात घेत महामंडळाने आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित ‘Smart Bot’ आणि ‘व्हॉट्सॲप (WhatsApp) सेवा’ सुरू करून डिजिटल क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.
योजनेची वर्षनिहाय ऐतिहासिक फलनिष्पत्ती:
महामंडळाच्या स्थापनेपासून ते आजवर मंजूर लाभार्थी आणि त्यांना मिळालेल्या व्याज परताव्याचा (कोटी रुपयांत) आलेख सातत्याने उंचावत आहे:
-
२०१७-१८ : २८ लाभार्थी (परतावा निरंक)
-
२०१८-१९ : ३,३६७ लाभार्थी (₹ २.६० कोटी)
-
२०१९-२० : ११,८९६ लाभार्थी (₹ २८.५३ कोटी)
-
२०२०-२१ : ८,३२५ लाभार्थी (₹ ६३.५५ कोटी)
-
२०२१-२२ : १६,४८२ लाभार्थी (₹ ११८.२९ कोटी)
-
२०२२-२३ : १५,८९५ लाभार्थी (₹ १७८.८१ कोटी)
-
२०२३-२४ : २४,४९१ लाभार्थी (₹ ३०१.०२ कोटी)
-
२०२४-२५ : ४६,७९२ लाभार्थी (₹ ३८८.८८ कोटी)
-
२०२५-२६ : ४९,९९२ लाभार्थी (₹ ५८८.६९ कोटी)
-
एकूण कामगिरी: १ लाख ७७ हजार २६८ मंजूर लाभार्थी आणि एकूण ₹ १,६७०.३७ कोटींचा व्याज परतावा!
२४ तास उपलब्ध ‘Smart Bot’ (AI सुविधा):
लाभार्थ्यांना अनेकदा पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि व्यवसाय निवडीबाबत प्रश्न असतात. पूर्वी यासाठी कार्यालयात खेटे मारावे लागत. मात्र, आता महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर कृत्रिम बुद्धिमत्ता (ChatGPT) आधारित ‘Smart Bot’ सुरू करण्यात आला आहे. हा बॉट २४ तास कार्यरत असून, त्यावर प्रश्न टाईप केल्यास त्वरित अचूक उत्तरे मिळतात. प्रकल्प खर्च, आर्थिक नियोजन आणि अर्जाच्या स्थितीबाबतही यातून मार्गदर्शन मिळते. आतापर्यंत १५,५०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
व्हॉट्सॲप सेवा: माहिती आता थेट मोबाईलवर!
लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती (LOI), क्लेम (Claim) सादर केल्याची पावती, अर्जाची मंजुरी (Sanction) आणि व्याज परतावा जमा झाल्याची सूचना आता थेट मोबाईलवर मिळण्यासाठी महामंडळाने 8976855921 हा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक सुरू केला आहे. लाभार्थ्यांनी या क्रमांकावरून आलेल्या मेसेजला २४ तासांत रिप्लाय करणे अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांना स्वतःच्या प्रकरणाची सद्यस्थिती वेळोवेळी घरबसल्या कळू शकेल. तसेच, महामंडळाच्या नवीन योजना आणि परिपत्रकांची माहिती देण्यासाठी एक ‘व्हॉट्सॲप चॅनेल’ही सुरू करण्यात आले असून नागरिकांनी त्याला ‘सबस्क्राईब’ (Subscribe) करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पनवेलमध्ये साकारणार अत्याधुनिक बहुउद्देशीय मुख्यालय:
महामंडळाच्या कार्याचा वाढता व्याप पाहता, राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार सिडकोची सुमारे दीड एकर जागा (पनवेल, नवी मुंबई येथे) केवळ १ रुपया प्रति चौरस मीटर या नाममात्र दराने महामंडळाला मंजूर करण्यात आली आहे. या जागेचे ‘Allotment Letter’ प्राप्त झाले असून हस्तांतरणाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या प्रस्तावित जागेवर लवकरच प्रशासकीय कार्यालय, लाभार्थी सहाय्यता केंद्र, कौशल्य विकास व निवासी प्रशिक्षण केंद्र आणि डिजिटल सेवा केंद्रांनी सुसज्ज अशी एक भव्य बहुउद्देशीय इमारत उभारली जाणार आहे.
