दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२२ । फलटण । दीड दिवसाची शाळा व जीवनात अपार कष्ट करून मानवी मनाच्या वेदना साहित्य रूपाने सर्वसामान्य जनतेसमोर मांडणारा थोर साहित्यिक म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे. पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकरी, कामगार, घाम गाळणाऱ्या बहुजनांच्या हातावर तरली आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले. पोटाची खळगी भरत एक एक अक्षर जोडून शब्द तयार करून एकापेक्षा एक सरस अशा साहित्यकृती निर्माण करणे असामान्य व्यक्तीमत्वाचे काम करत शाहिरी पोवाडे याद्वारे समाज जागृती करून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे साहित्यिक व समाज सुधारक असा नावलौकिक मिळाला असतानाही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उपेक्षित साहित्यिक राहिले असे मत साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी स्पष्ट केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती निंबळक ता. फलटण येथे अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते व साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संयोजक कुमार रिटे, कवी आकाश आढाव, प्रा. दीपक रिटे, अशोक केंजळे उपस्थित होते.
ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, वाटेगाव ते मुंबई हा प्रवास फार खडतर गेला. कुटुंबाची दैना झाली तरी आपल्या ध्येयापासून दूर गेले नाहीत. त्यांची फकिरा ही कादंबरी फार गाजली राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. कथा, कादंबरी,नाटके, कविता, लावणी, पोवाडे, निबंध, प्रवासवर्णन असे अनेक साहित्य प्रकारात त्यांनी लिखाण करून वंचित बहुजन यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. आयुष्यभर ते बंडखोर जीवन जगले त्याचा त्यांना फार त्रास झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर लहुजी वस्ताद साळवे व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अशोक बल्लाळ यांनी केले तर आभार कुमार रिटे यांनी मानले. सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेबरोबर थोर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी निंबळक गावातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमांची मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात आली.
सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने समाज बांधवांची व ग्रामस्थांची उपस्थिती होती. जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी कुमार रिटे व सहकार्यांनी परिश्रम घेतले.