दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
अण्णा भाऊ साठे हे जागतिक स्तरावरचे लेखक व कलावंत होते. त्यांनी मानवतावादी लेखन व कला सादर करताना उपेक्षित, वंचित, दलित, श्रमकरी व कामगारांच्या दुःखांना वाचा फोडून चेहरा नसलेल्या माणसांना चेहरा प्राप्त करून दिला. कारण त्यांना वंचितांच्या विकासाचा ध्यास होता, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालय फलटण येथील मराठी विभागप्रमुख प्रोफेसर (डॉ.) प्रभाकर पवार यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयाच्या विशेष दिन समितीने आयोजित केलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती कार्यक्रमात प्रोफेसर (डॉ.) प्रभाकर पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राचार्य प्रोफेसर (डॉ.) पी. एच. कदम होते.
पुढे बोलताना डॉ. प्रभाकर पवार म्हणाले की, वाटेगाव ते मुंबई ते रशिया असा अण्णा भाऊंचा जीवन प्रवास झाला. आपल्या जीवघेण्या संघर्षात अण्णा भाऊंनी सर्वहारा समाजातील स्त्री-पुरुषांची बाजू घेऊन त्यांना लेखनात आजारावर केले. फकिरा, वारणेचा वाघ, चिरानगरची भूतं, बरबाद्या कंजारी, गुलाम, नवती, मंगला, हरणा व सोना इ. कादंबर्या लिहिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्याच्या माध्यमातून योगदान दिले. ‘मुंबईची लावणी’ लिहिली व ‘माझा रशियाचा प्रवास’ हे स्वकथनही लिहिले. हे सर्वच लिखाण व कला सादरीकरण समाज परिवर्तनाला व प्रबोधनाला पोषक असल्याने पुढील लेखक पिढ्यांनी अण्णा भाऊंच्या साहित्य लेखनाचा आदर्श घेतला पाहिजे, असेही प्रो. डॉ. प्रभाकर पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य प्रोफेसर (डॉ.) पी. एच. कदम यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक विशेष दिन समितीचे चेअरमन डॉ. संतोष कदम यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी प्रा. सौ. योगिता मठपती यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)