दैनिक स्थैर्य । दि.१२ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । भांडवली बाजार नियामक अर्थात ‘सेबी’नं रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, उद्योगपती अनिल अंबानी आणि अन्य तीन व्यक्तींना कंपनीशी संबंधित कथित गैरव्यवहार प्रकरणी सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच अमित बापना, रविंद्र सुधाकर आणि पिंकेश शाह यांच्यावरही अशाच प्रकारे सेबीने कारवाई केली आहे.
सेबीने सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यास उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासह रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडसह अन्य तीन व्यक्तींवर निर्बंध घातले आहेत. त्यांना कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. सेबीने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे की, या कंपन्यांना आणि संबंधित व्यक्तींना, ज्यांचा भांडवल जमा करण्याचा स्पष्ट हेतू दिसतो, अशांना सेबीकडे नोंदणीकृत असलेली कोणतीही मध्यस्थ, सार्वजनिक कंपनीच्या संचालक आणि प्रवर्तकांशी व्यवहार करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहेत.
दुसरीकडे भांडवली बाजार नियामक सेबीने एनएसई आणि तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्यासह इतरांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ही दंडात्मक कारवाई एमडीच्या सल्लागारांच्या रुपानं आनंद सुब्रमण्यन यांच्या नियुक्तीत सिक्युरिटीज करार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात करण्यात आली आहे.
भांडवली बाजार नियामक सेबीने रामकृष्ण यांच्यावर तीन कोटी रुपये, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई), नारायण आणि सुब्रमण्यन यांच्यावर प्रत्येकी दोन कोटी रुपये आणि व्ही. आर. नरसिंहन यांच्यावर सहा लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. यासोबतच सेबीने एनएसईला अन्य कोणत्याही नवीन उत्पादनास सहा महिन्यांचे प्रतिबंध लावण्यात आले आहेत. रामकृष्ण आणि सुब्रमण्यन यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही मध्यस्थाशी व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. दुसरीकडे नारायण यांच्यावर ही बंदी दोन वर्षांसाठी असेल.