“आम्ही सर्व परिस्थितीत तुमच्या पाठीशी!” स्वीकृत नगरसेवक अनिकेतराजेंनी घेतली हिरणवाळे बंधूंची भेट; ‘लाईफ लाईन’मध्ये जाऊन दिला आधार


फलटण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये जाऊन शंकर मार्केट हल्ल्यातील जखमी हिरणवाळे बंधूंची सदिच्छा भेट घेतली आणि कुटुंबीयांना आधार दिला.

स्थैर्य, फलटण, दि. 26 फेब्रुवारी : फलटण शहरातील शंकर मार्केट परिसरात रविवारी रात्री गुंडांच्या भ्याड आणि प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले व्यावसायिक अनिल हिरणवाळे आणि संतोष हिरणवाळे यांच्यावर सध्या फलटण येथील ‘लाईफ लाईन’ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, फलटण नगरपरिषदेचे नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन या दोन्ही जखमी बंधूंची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

यावेळी अनिकेतराजेंनी गंभीर जखमी असलेल्या हिरणवाळे बंधूंना आणि त्यांच्या भयभीत झालेल्या कुटुंबीयांना मोठा मानसिक आधार दिला. या भ्याड हल्ल्यामुळे कुटुंबावर ओढवलेल्या या कठीण प्रसंगात त्यांना धीर देताना अनिकेतराजे म्हणाले की, “तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून, आम्ही सर्व परिस्थितीत तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”

शंकर मार्केटमध्ये गाडी हळू चालवण्यास सांगितल्याच्या रागातून १०-१२ जणांच्या सशस्त्र टोळक्याने हा जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेमुळे संपूर्ण फलटण शहरात आणि विशेषतः व्यापारी वर्गात प्रचंड घबराट व संतापाचे वातावरण आहे. या घटनेचा सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि व्यापारी संघटनांकडून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात श्रीमंत अनिकेतराजे यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन आधार दिल्याने, हिरणवाळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Back to top button
Don`t copy text!