निवडणूक निकाल एकाच वेळी लागणार; अनिकेतराजेंचा दावा, विरोधकांवर ‘गुंडगिरी’वरून हल्लाबोल


नागपूर खंडपीठाचा निवडणूक निकालाबाबतचा निर्णय बंधनकारक राहील. “लोकांना आता गुंडगिरी आणि दहशतीपासून बदल हवा आहे,” असे प्रतिपादन अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी केले. वाचा सविस्तर.

स्थैर्य, फलटण, दि. 04 डिसेंबर : “निवडणूक आयोगाच्या निकालाच्या तारखांमधील तफावतीबाबत नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय योग्य असून, तोच न्याय आम्हालाही लागू होणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीत कोणताही गोंधळ होणार नाही,” अशी माहिती शिवसेना प्रणित राजे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. तसेच, प्रचारादरम्यान विरोधकांवर निशाणा साधताना, “विरोधकांच्या गुंडगिरीला आणि दहशतीला कंटाळून लोकांना आता बदल हवा आहे,” असा घणाघातही त्यांनी केला.

खंडपीठाचा निर्णय आणि निकालाच्या तारखा

फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या तारखांबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “निवडणूक आयोगाने काही नगरपालिकांचे निकाल ३ व ४ तारखेला आणि काहींचे २० व २१ तारखेला जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे २० व २१ तारखेला होणाऱ्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, नागपूर खंडपीठाने यावर योग्य निर्णय दिला आहे.”

याचिका तांत्रिकदृष्ट्या निकाली

आम्ही या संदर्भात कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, नागपूर खंडपीठाचा निर्णय हा संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक आणि बंधनकारक असल्याने आमची याचिका आता तांत्रिकदृष्ट्या निकाली (Infructuous) निघाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणुकीत समानता राहील आणि कोणताही गैरप्रकार होणार नाही, असे अनिकेतराजे यांनी स्पष्ट केले.

“गुंडगिरी आणि दहशतीपासून सुटका हवी”

प्रचारादरम्यान मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना अनिकेतराजे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, विरोधक म्हणतात की आम्हाला बदलाचे राजकारण करायचे नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की लोकांनाच आता बदल हवा आहे. मागील काही वर्षांतील गुंडगिरी आणि दहशतीपासून फलटणच्या जनतेला सुटका हवी आहे. आम्हाला प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ही लढाई आम्ही जनतेसाठी लढत आहोत.” आगामी निवडणुकीत पूर्ण यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!