
स्थैर्य, फलटण, दि. २२ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ रविवारी (दि. २३) होणार आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि श्रीरामचरणी नतमस्तक होऊन या प्रचार मोहिमेचा नारळ फोडण्यात येणार आहे.
प्रचाराचा शुभारंभ आणि सभा
कोळकी गावचे राजे गटाचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अक्षय (भैय्या) गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ठिक ९:०० ते १२:०० या वेळेत फलटणचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
यावेळी अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी शिवसेना पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि कृष्णा भीमा कोरेगाव आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्र्यांची ताकद
महायुती आणि राजे गटाच्या या उमेदवारासाठी खुद्द पालकमंत्री शंभूराज देसाई मैदानात उतरले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. श्रीराम यात्रेच्या पवित्र मुहूर्तावर आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रचाराची सुरुवात होत असल्याने शक्तीप्रदर्शन जोरदार होण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांना आवाहन
“फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी या प्रचार शुभारंभ सोहळ्याला आणि सभेला नागरिक, तरुण आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन अक्षय (भैय्या) गायकवाड यांनी केले आहे.
