दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील अनिकेत अशोक फडतरे याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये संपूर्ण देशातून ४२६ वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केलेले आहे. अनिकेत फडतरे यांच्या भगिनी मोनाली फडतरे यांनी सुद्धा २०१६ साली केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या होत्या त्या आता बेंगलोर येथे आपली सेवा बजावत आहेत.
अनिकेत फडतरे याचा जन्म १९९४ साली फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे राहत असणाऱ्या अशोक फडतरे यांच्या कुटुंबात झाला. अनिकेत फडतरे याने आपले प्राथमिक शिक्षण हे पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतले तर माध्यमिक शिक्षण हे साखरवाडी विद्यालयामध्ये घेतले. व त्यांनंतरचे शिक्षण हे सातारा येथील नवोदय विद्यालयात घेतले. पुणे येथील एएमआयटी कॉलेज येथे अनिकेत यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. अनिकेत तिसऱ्याच प्रयत्नांत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत परीक्षात उत्तीर्ण झाला असून अनिकेत मुळे साखरवाडी गावासह फलटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुराच रोवला गेलेला आहे. अनिकेत फडतरे याने मिळवलेल्या यशाबद्दल अनिकेत याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.