जेवण न मिळाल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांचा संताप; शेगाव कोविड सेंटरमधील धक्कादायक प्रकार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,शेगाव, दि. १२: सकाळचे जेवण दुपारी दोन वाजेपर्यंतही न आल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांनी कोविड सेंटरच्या परिसरात येत संताप व्यक्त केला. शासकीय कोविड सेंटरमध्ये दोनशेहून अधिक पाॅझिटिव्ह रुग्ण असून, शुक्रवारी दुपारपर्यंत जेवण मिळाले नाही. त्यामुळे रुग्ण भुकेने व्याकूळ झाले.

शेगाव येथील विसावा केंद्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोविड उपचार केंद्र आहे. या कोविड केंद्रामध्ये जवळपास ३६० रुग्ण आहेत. दुपारचे जेवण दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत वेळेवर जेवण न येता २ वाजून ३० मिनिटांपर्यंतही या कोविड केंद्रामध्ये जेवण न आल्यामुळे रुग्णांनी संताप व्यक्त केला. तसेच विसावा कोविड केंद्राच्या परिसरात चक्क बाहेर आले. जवळपास २६० रुग्णांनी रस्त्यावर येत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वेळेवर जेवण न मिळणे, निकृष्ट दर्जाचे जेवण व सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत. तक्रारींची कोणीही दखल घेत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर आल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्वांत आधी उपाशी रुग्णांना जेवण देण्याच्या सूचना दिल्या. जेवण उशिरा का देण्यात आले, याबाबत चौकशी केली जाईल. तसेच दोषींवर कारवाई करण्यात येईल.
-दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी

जेवण पुरवण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केला आहे. जेवण उशिराचा प्रकार समजताच चौकशी केली असता सिलिंडर संपल्याने जेवण देण्यास उशिर झाल्याचे समजले. रुग्णांना जेवणास विलंब झाल्यामुळे शुक्रवारचे देयक कंत्राटदाराला दिले जाणार नाही.
– शिल्पा बोबडे
तहसीलदार, शेगाव


Back to top button
Don`t copy text!