दैनिक स्थैर्य । दि. १३ सप्टेंबर २०२२ । मुंबई । फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने (पूर्वीचे नाव एंजल ब्रोकिंग लिमिटेड) क्लाएंट्सच्या संख्येत भर घालणे सुरूच ठेवले असून, ऑगस्ट २०२२ मध्ये यात मागील वर्षाच्या तुलनेत ८१.९ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने आपल्या सरासरी दैनंदिन उलाढालीतही मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ११७.९ टक्क्यांची भर घालत, १२.३८ ट्रिलियन रुपयांचा टप्पा पार केला.
एंजल वन सातत्याने उत्तम व्यावसायिक कामगिरी करत आहे. कंपनीने ऑगस्ट २०२२ मध्ये ७२.५३ दशलक्ष ऑर्डर्सवर प्रक्रिया केल्याची नोंद केली, ही गेल्या वर्षीतील ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ४४.९ टक्के वाढ आहे. दरम्यान, कंपनीचा इक्विटी बाजारातील एकूण वाटा या महिन्यात २१.५ टक्के होता. एंजल वनचे सरासरी क्लाएंट फंडिग बुक ऑगस्ट २०२२ मध्ये १३.७२ अब्ज रुपयांवर होते.
एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी, कंपनीच्या ऑगस्ट महिन्यातील कामगिरीबद्दल म्हणाले, “एकंदर वातावरण प्रतिकूल असूनही, भारतातील डिमॅट खात्यांमध्ये तसेच रिटेल गुंतवणूकदार सहभागामध्ये सातत्याने वाढ होत आहे. दर महिन्याला अधिकाधिक लोकांना भांडवल बाजारात प्रवेश करण्याची क्षमता देऊन, एंजल वन या वाढीत योगदान देत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. एक डिजिटल कंपनी म्हणून, भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या लोकसंख्या गटांना सेवा देता आल्याचा तसेच देशातील वित्तीयीकरणाला हातभार लावल्याचा आनंद आम्हाला वाटतो.”
एंजल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. नारायण गंगाधर म्हणाले, “डिजिटायजेशन उद्योगक्षेत्राच्या वाढीला चालना देत आहे आणि यात एंजल वन अग्रभागी आहे. वाढच्या ग्राहकवर्गाला, केवळ अखंडितच नव्हे, तर सुरक्षित अशी डिजिटल परिसंस्था पुरवण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. दीर्घकालीन संपदासंचयाच्या प्रवासात पुढे जाताना त्यांना अशा परिसंस्थेची आवश्यकता भासत आहे. आम्ही ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी सातत्याने गुंतवणूक करतो आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून आमची उत्पादने व सेवा अद्ययावत करतो. ”