एंजेल वनने दुस-या तिमाहीच्या आर्थिक परिणामांची घोषणा केली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | एंजेल वन लिमिटेडने ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिक अलेखापरीक्षित आर्थिक परिणामांची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२२च्या पहिल्या तिमाहीच्या रु. ४७४५ दशलक्षच्या तुलनेत दुस-या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न रु. ५३८२ दशलक्ष झाले आहे. तिमाही-दर-तिमाही आधारावर यात १३.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. ग्राहक संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे उत्पन्नातही वृद्धी नोंदवण्यात आली.

कंपनीने ईबीटीडीएमध्ये १०.६ % टक्क्यांची त्रैमासिक वृद्धी घेतली आहे. आर्थिक वर्ष २०२२च्या पहिल्या तिमाहीच्या रु. १६३३ दशलक्षच्या तुलनेत यावर्षीच्या दुस-या तिमाहीत ते रु. १८३३ दशलक्ष झाले आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या दुस-या तिमाहीत कंपनीचे ईबीटीडीए मार्जिन (निव्वळ उत्पन्नाच्या % नुसार) ४७.४ % वर स्थिर राहिले आहे. कंपनीचा कर पश्चात नफा पहिल्या तिमाहीच्या रु. १२१४ दशलक्षच्या तुलनेत त्रैमासिक १०.६% वृद्धीसह दुस-या तिमाहीत रु. १३४३ दशलक्ष झाला आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाने दुसरा अंतरिम लाभांश म्हणून १० रुपयांच्या प्रत्येक इक्विटी शेअरमागे ५.७० रुपयांचा लाभांश देण्याची शिफारस केली आहे. तो तिमाहीतील करपश्चात एकूण नफ्याच्या ~३५ टक्क्यांइतका आहे. कंपनीने २०२२ वित्तवर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण ग्राहकसंख्येत तब्बल १.३ दशलक्ष नव्या ग्राहकांची भर नोंदवली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचे १.२ दशलक्ष ग्राहक वाढले होते.

अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री दिनेश ठक्कर म्हणाले की, “वित्तीय सेवा क्षेत्रात एंजेल वन ही नेहमीच अग्रगण्य राहिलेली असून तिने भारताच्या इक्विटी संस्कृतीत वैविध्यता आणण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हा परिपाठ पुढेही कायम राहील, याचा आम्हाला विश्वास आहे. आमच्या परिपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर जेनरेशन झेड आणि मिलेनियन्सनी आपल्या पसंतीची मोहोर उमटवली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग डेटा सायन्सच्या क्षमतांचा वापर करून आम्ही आमच्या तंत्रज्ञानात आणि उत्पादनांचा दर्जेदारपणा वृद्धिंगत करणे कायम ठेऊ. यातून आमच्या ग्राहकांना अखंडित आणि श्रेणीतील सर्वोत्तम अनुभव मिळत राहील.

या तिमाहीदरम्यान आमच्याशी तंत्रज्ञान आणि उत्पादन विकासातील कार्यकुशल मनुष्यबळ जोडल्या गेले आहे. ज्योतिस्वरूप राईतकर हे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. त्याच्यांसह अनेक वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील अधिकारीही आमच्या बंगळुरूतील उत्पादन विकास केंद्राशी जोडल्या गेले आहेत. या माध्यमातून आम्हाला साधेपणा, विश्वासार्हता, आणि कार्यक्षमता या आमच्या मूल सिद्धांतांना कायम ठेवत वैश्विक दर्जाच्या उत्पादने व सेवांच्या विकासात मोठी मदत मिळणार आहे. आमची स्वत:ची एएमसी स्थापन करण्याच्या उद्देशाने आम्ही सेबीकडे तत्वत: मंजुरीसाठी अर्ज दाखल केला आहे. संपत्ती-तंत्रज्ञान समाधान पुरवण्याच्या दिशने आमचे मार्गक्रमण सुरू असल्याने ही आमच्यासाठी एक मोठी उपलब्धी ठरणार आहे.”

मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री नारायण गंगाधर म्हणाले की, “सलग दुसऱ्या तिमाहीत आम्ही १.२ दशलक्षांपेक्षा जास्त ग्राहक जोडले आहेत. यातून प्रभावी तंत्रज्ञान आणि उत्पादन संचाच्या आधारे आमची मजबूत घोडदौड, तडाखेबंद मार्केटिंग आदींची चुणूक दिसून येते. या बळावर आमची एकूण ग्राहक संख्या ६.५ दशलक्षांवर पोहोचली आहे. वाढती ग्राहक संख्या आणि त्या प्रमाणात सक्रिय ग्राहकांचाही वाढता आकडा आमच्या संचालन वित्तीय प्रकृतीत सुधारणा करणारा ठरला आहे.

आम्ही आमच्या उत्पादन आणि तंत्रज्ञानच्या आधारभूत कुशल मनुष्यबळाचा विस्तार केला आहे. आता अल्पावधीत यंत्रणांचे आधुनिकीकरण, क्लाऊड तंत्रज्ञानाच्या क्षमताचा पुरेपूर वापर, उत्पादनांची विश्वसनीयता व सुरक्षा वाढवण्यावर आमचा भर राहणार आहे. दुसरीकडे, आम्ही अत्याधुनिक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मशीन लर्निंग आणि डाटा सायन्स तंत्राचा वापर करून आमचे वैयक्तिकृत नेक्स्ट जेन सुपर-ऍपही तयार करत आहोत. स्टॉक ब्रोकिंगचे लोकशाहीकरण आणि बाजारात सर्वोच्च स्थान गाठण्याच्या ध्येयाने आम्ही अनवरतपणे आमची उत्पादने, नवीन वैशिष्ट्ये व सेवांत सुधारणा करत आहोत. आमच्यासारख्या फिनटेक कंपन्यांसाठी विकासाच्या विशाल संधी उपलब्ध असून त्याचे यशामध्ये रूपांतर करण्यसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.”


Back to top button
Don`t copy text!