स्थैर्य, सातारा, दि. १७ : सातारा तालुक्यातील अंगापूर येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने अंग्लाईनगर मधील बाधित रूग्ण सापडलेल्या परिसरापासून २५० मीटरचा परिसर सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. दरम्यान ही माहिती मिळताच आरोग्य विभागाच्यावतीने संपूर्ण गावात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.अंगापूरातील अंग्लाईनगर मधील ५३ वर्षीय आरोग्य कर्मचारी महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अंगापूरकरांची धास्ती वाढली आहे. ही माहिती मिळताच रहिवासी भाग असणार्या अंग्लाईनगरात माईक्रो कन्टेंमेंन्ट झोन जाहीर करून सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. संबंधित महिला नागठाणे येथे आरोग्य विभागात कार्यरत आहेत. शनिवार दि. ११ जून पासून त्यांना ताप, थंडी, सर्दी अशक्तपणा जाणवत होता. प्रथम गावातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी गेले होते. उपचार करूनही काहीच फरक न पडल्याने गेली दोन दिवसांपूर्वी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.
बुधवारी रात्री त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अंगापूरातील महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समजताच गावात एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच नादगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सी. पी. सातपुते यांनी गावात भेट देवून आरोग्य कर्मचाऱ्यांना सुचना करीत गावातील लोकांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. बाधितांच्या घरातील व शेजारील अतिनिकट सहवासातील लोकांना तात्पुरत्या स्वरूपात गावातील अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान उपसरपंच जयश्री कणसे, ग्रामविकास अधिकारी संजय जाधव, सत्यवान वाघमारे, गावकामगार तलाठी सी. पी. माने व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये. तसेच मास्कचा वापर करावा. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामदक्षता कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.