दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | सातारा | दीपावलीपूर्वी सर्व थकीत मानधन मिळावे, 1 महिन्याचे मानधन ॲडव्हॉन्स म्हणून मिळावे, सेविकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा व दीर्घ सेवेचा विचार करुन सेवानिवृत्ती वेतन मंजूर व्हावे, आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी घंटानाद तर शालेय पोषण आहार संघटनेने मुक्कामी उपोषण सुरु केले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण संचालक पुणे यांना मानधनवाढीबाबत अहवाल पाठवण्याचे नोव्हेंबर 2016 मध्ये शासनाने सुचवले होते. शिक्षण संचालकांनी त्याप्रमाणे शाळा पोषण कर्मचाऱ्यांना किमान मासिक 5 हजार रुपये मानधनाची शिफारस केली होती. तेव्हापासून फरकासह मानधन अदा व्हावे. माजी केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी दिल्ली आंदोलनावेळी 3 हजार रुपयांची वाढ सुचवली होती. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना 12 महिने मानधन मिळावे, शालेय शिपायांप्रमाणे त्यांच्याकडून आजपर्यंत कामे करवून घेतली जात आहेत. सध्याही कामे करवून घेतली जात आहेत. त्यांना कुक कम शिपायाचा दर्जा देण्यात यावा, जोपर्यंत त्यांना शिपायाचा दर्जा दिला जात नाही. तोपर्यत नियमीत कामेच केली जातील, असे त्यांनी म्हटले आहे.