बालकांच्या विकासात अंगणवाडीचे महत्त्वपूर्ण योगदान

विडणी गावचे सरपंच सागर अभंग यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२५ | विडणी | विडणी गावात आयोजित झालेल्या आरंभ पालक मेळाव्यात, विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासात अंगणवाडीचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. हा मेळावा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प फलटण २, आरंभ अंतर्गत बीट विडणी, माझेरी, पिंप्रद, टाकळवाडे अंगणवाडी यांच्यावतीने उत्तरेश्वर मंदिर विडणी येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच सागर अभंग बोलत होते. कार्यक्रमास माझेरी च्या सरपंच सौ. मनीषा दिघे, टाकळवाडे च्या सरपंच सौ. हर्षदा मिंड, विडणी ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन अभंग, सदस्या सौ जयश्री शिंदे, पोलास पाटील सौ. शीतल नेरकर, डॉ. नयन शेंडे आणि पर्यवेक्षिका सौ. आशा रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरपंच अभंग म्हणाले, “अंगणवाडीतील मुलांची पालकांप्रमाणेच अंगणवाडी सेविका व मदतनीस काळजी घेत असतात. पालकांच्याही अपेक्षा वाढल्या असून लहानपणापासूनच बालकांचा पाया मजबूत करण्याचे काम अंगणवाडी करीत आहे.” पर्यवेक्षिका रणवरे मॅडम म्हणाल्या, “शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास साधने या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून धावपळीच्या युगात फास्ट फूड, मोबाईलच्या दुष्टचक्रात बालकांचा सर्वांगीण विकास होत नाही. त्यांचे पोषण, आहार, त्यांचा बौद्धिक विकास योग्य संस्कार, शारीरिक विकास झाला पाहिजे.”

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन आणि स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी बालकांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध घटकांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये बौद्धिक विकासाला चालना देणारे घटक, खाऊ कोपरा, परसबाग, खेळणी, पौष्टिक आहार, आरोग्य तपासणी, भविष्याचे झाड, चित्रवाचन, मुखवटे आणि मोबाईलचे दुष्परिणाम यासारखे विषय समाविष्ट होते. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनीस, बालक, पालक, विद्यार्थी आणि महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

बालकांच्या लहानपणापासूनच्या विकासावर भर देण्याची गरज आहे, हे स्पष्ट झाले. सरपंच अभंग यांनी आणि पर्यवेक्षिका रणवरे मॅडम यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडीच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. या मेळाव्याने पालक आणि समाजाला बालकांच्या विकासाच्या पायाभूत घटकांबद्दल जागरूक करण्याचे काम केले.


Back to top button
Don`t copy text!