दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एक जागेसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर 2022 पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरूवार, दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे.
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 7 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 14 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशन पत्रांची छाननी – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2022 (सोमवार), मतदानाचा दिनांक – 3 नोव्हेंबर 2022 (गुरुवार), मतमोजणीचा दिनांक – 6 नोव्हेंबर 2022 (रविवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 8 नोव्हेंबर 2022 (मंगळवार) आहे.
या पोटनिवडणुकीसाठी दि. 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार असून ही सामग्री उपलब्ध आहे.
मतदारांची ओळख पटावी यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक / पोस्ट ऑफिसचे फोटोसहीत पासबुक, वाहन परवाना, पॅन कार्ड, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टार अंतर्गत रजिस्टर जनरल ऑफ इंडीया यांचे स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसहीत निवृत्ती कागदपत्रे, केंद्र / राज्य / महामंडळ / मंडळ यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, विधानमंडळ सदस्य / लोकसभा सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमिकरण विभागाने दिलेले अंपगत्वाचे ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र मतदारांकडे असणे अनिवार्य आहे.
या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यासंदर्भातील माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या पक्षाकडून प्राधिकृत आहे, त्या पक्षालाही संबंधित उमेदवाराची निवड का केली याबाबतची माहिती वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कळविले आहे.