स्थैर्य, फलटण, दि. २५: आताचा कोरोनाचा काळ महाभयंकर आहे. रोजच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणा प्रचंड तणावाखाली आहे. रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत रुग्णाचे कुटुंबिय अतिशय हतबल होत आहेत. हाच दुर्दैवी अनुभव माझ्या पण वाट्याला आला. माझे वडील श्री.विक्रम हाडके यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांना इतर सहव्याधी असल्याने कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. पण फलटण शहरातील नामांकित हॉस्पिटल्समध्ये कुठेच जागा शिल्लक न्हवती. अशातच आमचे मित्र पै.पप्पू शेख यांच्या प्रयत्नांमुळे व कुमार काळे (ॲम्बुलन्स) यांच्या सहकार्य डॉ.भारत पोंदकुले, डॉ. प्रशांत मिंड व डॉ. महेश पाटील (कोकणे) यांच्या सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये (शिवाजीनगर, फलटण) वडिलांना दाखल केले.
अर्थातच उपचार सुरू होईपर्यंत आम्ही प्रचंड तणावाखाली होतो. डॉ.भारत पोंदकुले हे तपासणी करत होते. त्यांच्याशी आमचा कसलाही परिचय तर न्हवताच शिवाय याआधीचा कुठला अनुभवही न्हवता. त्यांच्याकडे जाण्याची ही पहिलीच वेळ. डॉक्टरांनी तपासणी अंती सर्व परिस्थिती आम्हाला अगदी सविस्तर स्पष्ट केली. त्यावेळी डॉक्टरांचे रुग्णांशी व रुग्णांच्या नातेवाईकांशी आपुलकीने वागणे, बोलणे, उपचारपद्धती पाहून खूप समाधान वाटले. पुढील उपचार, संभाव्य धोके याबाबत त्यांनी कल्पना दिल्यानंतर आम्हीही त्यांच्यावर विश्वास ठेवून सगळ्याला संमती दिली आणि त्यांनी उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या योग्य उपचारानंतर आजमितीस वडिलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून इतर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी असलेल्या इतर रुग्णांचेही डॉक्टरांबाबत चांगलेच अनुभव आहेत. प्रत्येकजण त्यांचे कौतुकच करतात. डॉक्टरांच्या अविर्भावशून्य साधेपणामुळे ते प्रत्येकाला अगदी आपल्या घरातील सदस्यच वाटून जातात.
डॉक्टरांची रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांप्रती असलेली वागणूक अत्यंत जिव्हाळ्याची तर आहेच पण या दरम्यान मनाला सर्वात विशेष भावलेली घटना म्हणजे, रुग्णालयात जेव्हा बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर मागवण्यात आले, तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ते सिलेंडर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसमवेत स्वतः डॉक्टर उचलून आणून ठेवत होते. हे चित्र पाहून क्षणभर विश्वासच बसला नाही. डॉक्टरांची रुग्णसेवेबाबतची ही स्पष्ट, प्रामाणिक तळमळ पाहून अक्षरशः आम्ही सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.
रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना उपचार सुरू केल्यापासून डॉ. भारत पोंदकुले हे घरी न जाता दिवस – रात्र सेवा देत आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही त्यांनी तिथेच करून घेतली आहे. एखादी व्यक्ती आपल्या सेवेप्रती इतकी बांधिलकी जपू शकते, हे पाहून त्यांच्याप्रती निश्चितच अभिमान वाटतो.
एकूणच डॉ.भारत पोंदकुले यांना, या भीषण परिस्थितीत रुग्णांना विश्वासक साथ देणारा, आपुलकीने दिवस – रात्र सेवेसाठी तत्पर रहाणारा, माणुसकी जपणारा माणसाच्या रूपातील देवदूतच म्हणाव लागेल. या कठीण परिस्थितीत डॉक्टरांनी आमच्यावर असंख्य उपकार केले आहेत, ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. तरीही हा केलेला छोटासा प्रयत्न.
डॉक्टर, तुम्हाला शतशः धन्यवाद !
– गणेश (बंटी) विक्रम हाडके,
रा.शुक्रवार पेठ, सणगर गल्ली,
फलटण, जि. सातारा.