दैनिक स्थैर्य । दि. १० एप्रिल २०२३ । मुंबई । इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मारकाच्या प्रतिकृती पाहणी बाबत बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, इंदू मिलचे प्रणेते, सरसेनानी आनंदराज आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर त्याचप्रमाणे सुरेखा कुभांरे, राजेंद्र गवई, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, समाजसेवक रॉय सालीयन, रमेश जाधव तसेच विविध संघटना, त्याचे पदाधिकारी यांच्यासमवेत दिल्ली येथे बैठक झाली तिथे संबंधित प्रतिनिधींशी चर्चा झाली व मूर्ती शिल्पकार राम सुतार व त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्या कलादालनास गाझियाबाद येथे सदिच्छा भेट दिली, त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २५ फुटी प्रतिकृतीची उपस्थितांनी पाहणी केली त्यावेळी आनंदराज आंबेडकर व भीमराव आंबेडकर या बंधूनी सुतार पिता पुत्रास योग्य ते बदल सुचवून मार्गदर्शक सूचना केल्या तसेच मागील ठरावानुसार साडे तीनशे फूट उंचीचा पुतळा व शंभर फूट उंचीचा चबुतरा अशी साडे चारशे फूट उंचीचा पुतळा समुद्रकिनारी उभा करण्यात यावे अशी सूचना केली.
पुतळ्याची भव्यदिव्य प्रतिकृती जरी दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात पूर्णाकृती पुतळा बनून सज्ज होण्यास अजून अडीच वर्षाचा काळ लागण्याची संभावना आहे त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांनी सरकारच्या शिथिल धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली, सदर पुतळ्याचे भूमिपूजन आठ वर्षेआधी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते त्यानंतर त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करून अगदी अल्पावधीतच पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण ही केले, परंतु त्याआधी काम सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या कामाने अद्याप वेग धरलेला नाही याची खंत मा. आनंदराज आंबेडकर व मा. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी व्यक्त केली.
सदर भेटीत मा. आनंदराज आंबेडकर व मा. भीमराव आंबेडकर यांनी सुतार पिता-पुत्रांचे त्यांच्या कार्याबद्दल कोडकौतुक केले व सरकार सदर कामावर लक्ष घालून लवकरात लवकर सदर पुतळ्याचे काम पूर्ण करून त्याचे अनावरण करतील अशी आशा बाळगत राम सुतार यांच्या कलाभवनाचा निरोप घेतला.