
दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । सातारा । लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना वयाच्या १६ व्या वर्षी भगवद् गीता हाती लागली होती. तेव्हापासून मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा भगवद् गीतेवरील टीका ग्रंथ लिहून होईपर्यंत लोकमान्यांनी गीतेचा सखोल अभ्यास केला होता. त्यामुळेच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला भगवद् गीतेतील कर्मयोगाचा आधार असल्याचे जाणवते, असे प्रतिपादन अखिल भारत हिंदुमहासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद कुलकर्णी(जयसिंगपूर) यांनी येथे बोलताना केले.
अखिल भारत हिंदुमहासभेच्यावतीने येथील गुजराती महाजन वाडा सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक भक्तांच्या मेळाव्याचे आयोगन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून श्री. कुलकर्णी बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हिंदुमहासभेचे प्रदेशाध्यक्ष अँड. गोविंद तिवारी (जळगाव) होते. मेळाव्याला सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, जळगाव, रायगड, नाशिक जिल्ह्यातून टिळक भक्त उपस्थित होते. सुरुवातीस प्रदेशाध्यक्ष अँड. तिवारी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सातारा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप यांनी स्वागत केले तर प्रमुख प्रदेश कार्यवाह अँड. दत्तात्रय सणस (सातारा) यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सातारा शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि हिंदुत्वासाठी विशेष योगदान देणारे कार्यकर्ते यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सातारा शहरातील कोरोना योध्द्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अँड. तिवारी म्हणाले, लोकमान्य डिळकांचे विचार आजही आपल्याला देशसेवेची प्रेरणा देतात. टिळक आणि सावरकरांचे विचारच या देशाला बलशाली बनवू शकतात. म्हणून नवीन पीढीने या दोन्ही महापुरुषांच्या विचाराचा सखोल अभ्यास करुन राष्ट्रकार्यात योगदान देण्यासाठी हिंदुमहासभेच्या माध्यमातून कार्यरत झाले पाहिजे. यावेळी हिंदुमहासभेचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप केणी यांचेही भाषण झाले. शेवटी प्रदेश सहकार्यवाह उमेश गांधी यांनी आभार मानले. सातारा जिल्हा हिंदुमहासभेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.