
स्थैर्य, फलटण : निंबळक ता. फलटण गावच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेहाचा पंचनामा केला असून, अज्ञात संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवार दि. १ जुलै रोजी निंबळक गावच्या हद्दीमध्ये एका विहिरीमध्ये अज्ञात महिलेचा खून करून तिचा मृतदेह टाकला असल्याची माहिती निमलक गावचे पोलीस पाटील समाधान कळसकर यांना मिळाली. त्या नंतर पोलीस पाटील समाधान कळसकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका लाल रंगाच्या चादरीमध्ये मानवी मृतदेह दोरीने बांधलेल्या स्थितीमध्ये असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलीस पाटील कळसकर यांनी याबाबतची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढून मृतदेहाचा पंचनामा केला.
सदर मृतदेह वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या महिलेचा असून त्या मृतदेहावर काळ्या रंगाची पॅन्ट व गुलाबी रंगाचे टी-शर्ट आहे. याबाबत पोलिसांनी पंचक्रोशी मध्ये विचारपूस केली असता, तो मृतदेह कोणीच्याही ओळखीचा नसल्याचे पोलिसांना नागरिकांनी सांगितले. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या महिलेचा खून करून तिचा मृतदेह फलटण तालुक्यात आणून विहिरीत टाकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत सोलापूर पुणे जिल्ह्यातील बेपत्ता असलेल्या महिलांबाबत माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी निंबळक गावचे पोलीस पाटील समाधान महादेव कळसकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. याबाबत अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत करीत आहेत.