स्थैर्य, पांचगणी, दि.०८: महू धरणात आज दुपारी गुरे चारण्यासाठी आले असता पोहताना कु. प्रणव संतोष गोळे (वय 11) हा मयत झाल्याची घटना घडली. अद्याप प्रणव याचा मृतदेह सापडला नसून महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान त्याला शोधण्याचा आटोकाट करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की महू ता. जावली धरणात महू गावातीलच शिवराम नारायण गोळे हे आपला नातू कू. प्रणव संतोष गोळे हे दोघे गुरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास शिवराम गोळे हे रस्त्याला लागूनच गुरे चारत होते. गुरांना पाणी पाजून आजोबा रस्त्याकडे निघाले होते. परंतु, प्रणव हा त्यादरम्यान, धरणाच्या पाण्याकडे धावत जात होता. आजोबांनी आवाज दिला परंतु तो तसाच पळत होता. प्रणव पळत पाण्याकडे गेला आणि कपडे काढून त्याने पाण्यात उडी घेतली.
आजोबांनी लगेच पुण्याला असलेला आपला दुसरा मुलगा अजित शिवराम गोळे याला कळवले त्याने लगेच गावातील लोकांना सांगितले. त्यावेळी गावातील युवकांनी धरणाच्या दिशेने धाव घेतली. त्याचा शोध घेतला. परंतु, प्रणव सापडत नसल्याने लगेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना पाचारण केले. जवान बोटच्या साहाय्याने मृतदेह शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे प्रणवच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.